“गुड फ्रायडे” क्रुसावरील सात शब्दावरील संदेश.

” गुड फ्रायडे” क्रुसावरील सात शब्द .

गुड फ्रायडे
प्रस्तावना: त्याने त्या वधस्तंभावर सत्तास, अधिकाऱ्यांस नाडून घेऊन त्यांचे उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवला, कल २:१५. होय, माझा राजा “प्रभू येशू ख्रिस्त” याने दोन हजार वर्षांपूर्वी त्या वधस्तंभावर सैतानाच्या सत्तास व अधिकाऱ्यांस नाडुन त्यांच्या खऱ्या विकृत चेहऱ्याचा पर्दापाश केला, व त्यांच्यावर विजय मिळवला. सैतान व आकाशातील दुरात्म्यांची सत्ता, पापाची सत्ता, मरणाची सत्ता, या अंधाराच्या सत्तांना त्याने परास्त करून त्यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. त्याने मृत्यूच्या साम्राज्यात घुसून त्याच्या मुसक्या आवळल्या व तिसऱ्या दिवशी जिवंत उठून तो मृत्युजंय झाला. हा विजय फक्त त्याचाच होता; पण सर्व मानव जाती साठी होता. मानवाला न्यायी ठरवणारा, त्याला देवाशी जोडणारा, त्याच्यासाठी स्वर्गाची द्वारे उघडणारा, युगांयुग आपल्या निर्माणकर्त्यासह जीवन जगण्यासाठीच सनातनत्व प्राप्त करून देणारा होता.

आज्ञाभंगाच्या पापामुळे सैतानी सत्ता मानवी जीवनावर अधिपत्य मिळवू शकल्या होत्या. त्यांनी मानवी जीवनाचा प्रत्येक प्रदेश व्याप्त केला होता. मानवी सहजीवन, प्रत्येक संस्कृती, रूढी, परंपरा, राजसत्ता, व धर्मसत्ता.

या सर्वच मानवी व्यवस्था सैतानी सत्तांनी गिळंकृत केल्या होत्या. ह्या सत्तांनी समाजात धर्मभेद, जातीभेद, वंशभेद, रंगभेद, लिंगभेद, गुलामगिरी, गरीबी, अज्ञानाच्या बरोबरच अंधश्रध्दा, जादूटोणा, वेगवेगळ्या विद्या, अघोरी कर्मकांडे, मूर्तिपूजा, भ्रांत कल्पना, अशा अनेक गोष्टींच्या द्वारे सैतानाने मानवी जीवनात विष कालवून ते शापित केले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने देव इच्छेला पूर्णपणे अनुसरून क्रुसावरील मरण पत्करले व पहिल्या मानवाने श्रेष्टत्वाच्या मोहात पडून केलेल्या आज्ञाभंगाच्या पापातून सोडवले.  हे सर्व देवाने मानवाच्या तारणासाठी केले, म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपूर्ण त्यागाची आठवण व त्याच्या प्रती आभार व्यक्त करीत आपण  “गुड फ्रायडे” साजरा करितो. चर्चने प्रभू येशू ख्रिस्ताला योग्यपणे समजून घेऊन अनुसरावे यासाठी चर्च मध्ये येशू ख्रिस्ताने क्रुसावरून उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश दिले जातात. पुनरुत्थानाच्या सणाच्या अगोदरचा हा अतिशय महत्वपूर्ण टप्पा आहे. ख्रिस्त गुड फ्रायडे च्या दिवशी मरण पावला; पुरल्यागेला व तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आज गुड फ्रायडे च्या निमित्ताने हे  “आत्मिक रहस्य” जाणून घेऊ.

देवाची योजना: पवित्र शास्त्र सांगते की देवाने मानवाला परिपूर्ण असे निर्माण केले होते. दुःखाने,कष्टाने भरलेले जीवन व शेवटी मृत्यू ,असे जीवन देवाने मानवाला दिले नव्हते. सैतानाने प्रथम मानवाला फसवले व देवाविरुध्द चेतवून विद्रोह करण्यास भाग पाडिले. त्यामुळे प्रथम मानवाने आज्ञाभंग करून देव इच्छेला नाकारले. या पापामुळे  मानव शापित झाला. येथेच मानवी जीवनात सैतानी सत्तेचा उदय झाला.

जेंव्हा सैतानाने मानवाला पापात पाडिले तेंव्हाच देवाने मानवाला सैतानाच्या सत्तेखालून सोडवण्याची योजना केली होती. या बद्दल उत्पत्ती ३:१५ मध्ये आपल्याला पहावयास मिळते. येथे देवाने घोषित केले होते की भविष्यात सैतान कश्याप्रकारे त्याच्या कर्माचे फळ भोगील व कुमारीच्या पोटी जन्मलेला पुत्र देव इच्छेला समर्पित असा स्वयज्ञ अर्पण करून मानवाला या पापाच्या शापापासून मुक्त करील. येथे देव म्हणतो,”मी तुझ्यामध्ये व स्रिच्यामध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन; तो तुझे डोके फोडील, आणि तू त्याची टाच फोडशील. हे स्त्रीचे बीज आहे प्रभू येशू ख्रिस्त.

स्वतः परमेश्वर कुमारीच्या पोटी जन्म घेऊन ह्या न्यायाला पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर आला होता. त्यामुळे त्याच्याठायी प्रथम मानवाने केलेल्या पापाचा दोष नव्हता. तो परिपूर्ण मनुष्य होता. आता त्याला देव इच्छेला परिपूर्ण समर्पित असे जीवन जगून मानवाला न्यायी ठरवायचे होते. हे त्याच्या मृत्यूनेच सिध्द होणार होते कारण जो पर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याच्याकडून आज्ञाभंगाचे पाप होण्याची शक्यता कायम राहणार होती.

सैतानाने प्रथम मानवाला जसे फसवले होते तसे या परिपूर्ण मानवाला फसवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळाले नाही. दुसरीकडे सैतानाच्या प्रत्येक कूटनीतीचा सामना करीत प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे हा परिपूर्ण मानव देवराज्याची मूल्ये, सामर्थ्य व अधिकार प्रगट करीत देवाच्या इच्छेला समर्पित जीवन कसे जगावे हे आपल्या शिष्यांना दाखवत होता. देव राज्याच्या मूल्यांपुढे, सामर्थ्यापुढे, व अधिकारापुढे सैतान व त्याच्या आधीन असलेल्या सत्तांचे काहीच चालत नाही हे प्रभू येशू मानवाला पुराव्यानिशी दाखवून देत होता. यासाठीकी मानवाने त्याच्यावर विश्वास ठेवावा व त्याच्या मार्गाने चालत सैतान व त्याच्या अंधाराच्या बंधनातून मुक्त व्हावे.

देवाच्या योजनेचा महत्वपूर्ण टप्पा : आता तारणाची योजना अंतिम टप्प्यात आली होती. प्रभू येशू ख्रिस्त ज्याला देवपुत्र, मानवपुत्र, दावीतपुत्र, अश्या उपाध्या दिल्या होत्या तो परमेश्वराचा अवतार; पापाची सत्ता, मरणाची सत्ता, व अंधाराची सत्ता नष्ट करण्यासाठी; दैवी मूल्यांना अनुसरत देव इच्छेला पूर्णपणे समर्पित रहात सैतानावर व त्याच्या मृत्यूच्या पाशावर निर्णायक विजय संपादन करण्यासाठी सिध्द झाला होता. समस्त मानवजातीसाठी तारणाचा म्हणजे मुक्तीचा मार्ग  करण्यास तयार होता. हा तारणाचा मार्ग म्हणजे, जो कोणी मनुष्य ह्या मृत्युजंय प्रभू येशूवर विश्वास ठेवील म्हणजे त्याच्या पवित्र मार्गाला अनुसरील त्याला पवित्र आत्म्याद्वारे, दैवी सामर्थ्य प्राप्त होऊन तो सार्वकालिक म्हणजे सनातन जीवनाचा भागी होणार होता. येथे सैतानाच्या संपूर्ण पारिपत्याचा काऊंट डाऊन सुरु झाला होता.

दोन महासत्ता आमनेसामने उभ्या ठाकल्या: मृत्यूच्या परीक्षेला यशस्वी रित्या सामोरे जाण्यास  प्रभुयेशू ख्रिस्त तयार झाला असल्यामुळे सैतानाला कळूनचुकले होते की आता तो या न्याय प्रक्रियेत हरणार व मानव न्यायी ठरणार हे तो जाणून असल्यामुळे अतिशय चिडला होता. आपल्या सर्व शक्तीनिशी तो गेथशेमानी बागेत उभा ठाकला. एकाबाजूला धूर्त, कपटी, लबाड, क्रूर, सैतान, त्याच्याहाती असलेल्या धर्मसत्ता, राज्यसत्ता, अंधाराच्या सत्तेचे निष्ठावान प्रतिनिधी व दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याची मूल्ये, अधिकार, सामर्थ्य व देव इच्छेला मरेपर्यंत समर्पित राहण्याचा दृढनिश्चय करून उभा आहे योहान १४:३०-३१. व जणूकाही तो सैतानाला आव्हान करीत आहे की, सैताना तू कितीही जोर लाव मी आज तुझे डोके फोडणार, मानवावरील पापाचा व शापाचा अधिकार आज संपणार. आजपासून पुढे माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती स्वर्गीय सामर्थ्याने पूर्ण असेल. तो तुझ्यावर पाय देऊन चालेल, तुझी कुठलीच सत्ता व अधिकार त्याच्यावर चालणार नाही. तो मरणातून जीवनात पार जाईल व माझ्याबरोबर आनंद व शांतीने भरलेले सार्वकालिक जीवन जगेल.

निर्णायक युध्दाचे रणसिंग: आपल्यावर चालून आलेला सैतान व त्याच्या ताब्यातील माणसे प्रभू येशूने ओळखली व थेट त्यांनाच विचारले तुम्ही कोणाचा शोध घेत आहात, ते म्हणाले येशू नासरेथकर याचा तो म्हणाला,”तो मी आहे” त्याचे हे शब्द एकूण ते मागे फेकल्या गेले व भूमीवर पडले. योहान १८:६. या द्वारे सैतान व त्याच्या स्वाधीन असलेल्या सत्ताना ख्रिस्ताने इशारा दिला की, तुमची औकात नाही की तुम्ही माझ्यावर चालून यावे हे लक्ष्यात घ्या. मी मानवावरील प्रीतीमुळे तुमच्या स्वाधीन होत आहे.

देव इच्छेला समर्पित जीवनाच्या द्वारे मृत्यूशी  सामना करून त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी ख्रिस्त त्यांच्या स्वाधीन झाला. या युध्दात सैतान त्याची कूटनीती व क्रूरतेचा कळस करीत होता. तर प्रभू येशू ख्रिस्त धैर्याने एक एक शास्त्रलेख पूर्ण करीत मरणाच्या मुसक्या आवळत होता. हे येथे लक्ष्यात घ्या…

अंधाराची सत्ता आपली क्रूरता प्रगट करू लागली: जसेच प्रभू येशूने स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले अंधाराच्या सत्तेने तीची क्रूरता दाखवण्यास सुरुवात केली. सैतान जेव्हा आक्रमण करितो तेव्हा तो त्याच्या कूटनीतीचा व बलाचा निर्लज्य पणे वापर करितो. प्रभू येशूचे मनोधैर्य खचवून त्याला विचलीत करून त्याला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करण्यासाठी तो निकराचे प्रयत्न करू लागला.

कार्याची निरर्थकता दाखवून दिली: आपण कोणतेही चांगले कार्य हाती घ्या सैतान त्याची निरर्थकता आपल्या समोर आणून आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. येथे एक गोष्ट लक्ष्यात घ्या पेत्र आपल्याला तीन वेळा नाकारील याची जाण प्रभू येशू ख्रिस्ताला होती  कारण तो सर्वज्ञानी देव आहे. सैतानाच्या बाबतीत असे नाही तो आपले कार्य साधण्यासाठी त्याच्या धुर्तपणात समोरच्याला अडकवण्याचा प्रयत्न करितो. त्याने पहिला वार केला तो प्रभू येशूला त्याच्या कार्याची निरर्थकता दाखवण्याचा प्रयत्न करून.

प्रभू येशूला पकडल्यानंतर सैतानाने असे भीतीदायक वातावरण निर्माण केले की कोणाच्याही काळजाचे पाणीपाणी होईल. त्यामुळे ख्रिस्ताचे सर्वच शिष्य घाबरून गेले होते व त्याला पेत्रही अपवाद नव्हता. त्यामुळे त्याने ख्रिस्ताला तीन वेळा नाकारले. या नाकारण्यातून सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवून देऊ इच्छित होता की, बघ तू कोणासाठी मरत आहेस, तुझ्या तोंडावर तुझ्या सर्वात भरवशाच्या शिष्याने तुला नाकारले इतरांची काय कथा. तू यांच्यासाठी मरतोस पण हे तुझ्यावर विश्वास ठेवतील का? आणि जर त्यांनी विश्वास ठेवलाच नाही तर त्यांच्यासाठी मरून काय उपयोग? सर्वसामान्य माणसं अशा गोष्टीना बळीपडून आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होतात. कारण त्यांना त्यांच्या कार्याचं महत्व व परिणामांची खात्री नसते. परंतु ख्रिस्ताच्या बाबतीत असे असणे शक्यच नाही त्याला सैतानाचा प्रत्येक डावपेच माहित होता. व त्याच्या कार्याचे महत्व व त्याचे परिणाम ह्या बद्दलची त्याला खात्री होती.

आत्मसन्मानाला डिवचले: जर तुम्हाला आपल्या कार्याचे महत्व व त्याचे परिणाम याची खात्री असेल तर तुम्ही निर्धाराने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करूलागता. तेव्हा तुम्हाला विचलित करून चुकीचे पाऊल उचलण्यास  सैतान प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करितो. कारण तुमच्या कामात अडखळा आणून तुमचे कार्य त्याला बिघडवून टाकायचे असते. ख्रिस्ताच्या बाबतीतही त्याने असेच केले. येथे एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे  सैतानाने सर्व परिस्थिती त्याच्या हाती घेतली होती. त्याच्या प्रभावाखालील माणसे पूर्णतः त्याच्या स्वाधीन होती. आपल्याला येथे रोमी शिपाई, शास्त्री, परूशी, हेरोद, पिलात हि सर्व माणसे गोष्टी करताना दिसतात पण ती सर्व सैतानाच्या हातातील पात्रे आहेत.

पेत्राने प्रभू येशूला नाकारले पण त्याचा किंचितही परिणाम ख्रिस्ताच्या चित्त वृत्तीवर झाला नाही. मग, ज्या मनुष्यांनी प्रभू येशूला धरिले होते त्यांनी त्याला मार दिला व थट्टा केली. त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, अंतर्ज्ञानाने बोल; तुला कोणी मारले हे सांग. त्यांनी त्याची निंदा करून त्याच्या विरुध्द इतर पुष्कळ गोष्टी उच्चारिल्या. लूक २२:६३-६५. हे सर्व करण्यामागे सैतानाचा हाच उद्देश की प्रभू येशूने चिडून जाऊन दैहिकतेला अनुसरून या गोष्टींचा प्रतिकार करावा व देव इच्छे पेक्षा स्वतःच्या व्यक्तित्वाला महत्व द्यावं. परंतु असे काहीही घडले नाही प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला पूर्ण पणे देव इच्छेच्या  स्वाधीन केले यासाठीकी मानव देवासमोर न्यायी ठरावा व सैतान दोष पात्र.

कट कारस्थान : आपण जेव्हा कुठल्याच कूटनीतीला बळी न पडता आपल्या लक्ष्याकडे अग्रेसर होतो तेव्हा सैतान आपल्याला रोखण्यासाठी कट कारस्थाने करायला सुरुवात करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा रात्रभर छळ करण्यात आला, त्याला मुख्य याजकाच्या घरी नेले. तेथे मुख्य याजक, वडील व शास्त्रीं जमा झाले. पुष्कळांनी त्याच्या विरुध्द खोट्या साक्षी दिल्या, ज्या विसंगत व धांदात खोट्या होत्या. ख्रिस्त मात्र शांत पणे ते पहात होता. त्याने काहीतरी बोलावे व त्याच्यावर आपल्याला मरणदंडास पात्र असा काही दोष ठेवता यावा असा त्यांचा डाव होता, म्हणून मुख्य याजक त्याला म्हणाला हे लोक तुझ्या विरोधात इतके बोलत आहेत तरी तू काहीच उत्तर का देत नाहीस. परंतु तो काहीच बोलला नाही. तेव्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले की, “धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?” येशूने म्हटले, मी आहे; तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले, व आकाशाच्या मेघासह येताना पहाल. तेव्हा मुख्य याजकाने आपले वस्त्र फाडून म्हटले की ,” आम्हाला साक्षीदारांची काय गरज ? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुम्हाला कसे वाटते? तेव्हा त्यांनी सर्वांनी ठरवले की हा मरणदंडास पात्र आहे. त्याच्यावर थुंकण्यात आले, त्याचे तोंड झाकून बुक्क्यांनी मारले व अंतर्ज्ञानाने बोल असे म्हणत असता कामदारांनीही त्याला मारले. रात्रीच्या समयी ख्रिस्तावर हा अनाधिकृत खटला चालवणे हा कटकारस्थानाचा  भाग होता.

आता राजसत्तेच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवून त्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचा डाव या धर्मसत्तेचा होता. या साठी दिवस उगवताच लोकांचे वडील मंडळ एकत्र जमले यात मुख्य याजक व शास्त्रीं होते. त्यांनी त्याला न्याय सभेत मसलत केली व त्याला रोमी आधिकारी पिलात याच्या पुढे नेले. मार्क १४:५३:७२. लूककृत शुभवर्तमानात या सकाळच्या घटनेचे वर्णन केले आहे. प्रभू येशूवर ठपका ठेवण्यासाठी मुख्य याजक त्याला मुद्दाम पुन्हा विचारतो की, तू ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. हा एक धूर्तपणाचा प्रश्न होता कारण त्यांनी प्रभू येशूवर कधीच विश्वास ठेवला नव्हता. योहान ८: ५७-५८ मध्ये आपण पाहतो की, येशूने त्यांना म्हटले, ” मी तुम्हांस खचित खचित सांगतो, अब्राहाम झाला त्या पूर्वी मी आहे . तेंव्हा त्यांनी त्याच्यावर धोंडे उचलेले, परंतु येशूने आपणास गुप्त केले, आणि तो मंदिरातून निघून गेला. योहान १०: ३०-३१ मध्ये जेव्हा येशूने म्हटले की मी आणि बाप एक आहोत, तेव्हाहि त्यांनी त्याच्यावर दगड उचलले होते. या अनुभवावरून हे स्पष्ट होते की, आताही ते त्याला समजून घेण्यासाठी प्रश्न विचारीत नव्हते तर ते फक्त त्याला दोष लावण्यासाठी हे करत होते. म्हणून प्रभू येशू त्यांना म्हणतो की, मी जर तुम्हांस सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही, व मी जर तुम्हांस काही विचारले तर तुम्ही उत्तर देणारच नाही, पण मी तुम्हास सांगतो, या पुढे मनुष्याचा पुत्र देवाच्या सामर्थ्याच्या उजवीकडे बसेल. तेव्हा त्यांनी पुन्हा त्याला विचारले तू देवाचा पुत्र आहेस काय ? तेव्हा त्याने म्हटले तुम्ही म्हणता तो मी आहे. येथे त्यांनी त्याच्या उत्तराला समजून घेतलेनाही व म्हटले आपल्याला आणखी पुरावे कशाला पाहिजेत त्याच्याच तोंडून आपण ऐकले आहे. तेव्हा त्यांनी एकमत होऊन रोमी अधिकारी पिलात यांच्याकडे नेले. लूक २२:६६-७१.

पिलाता समोर खोटे आरोप: यहुद्यांच्या पुढाऱ्यांनी पिलाता समोर त्याच्यावर जे आरोप ठेवले ते धांदत खोटे होते.ते म्हणाले, हा आमच्या राष्ट्राला फितवताना व कैसरला कर देण्यास मनाई करताना आणि मी ख्रिस्त राजा आहे, असे म्हणताना आम्हांला आढळला आहे. वास्तविक पहाता प्रभू येशूने या पैकी काहीही केले नव्हते. लुक २०:२०-२६ मध्ये आपण पाहतो की, याच धर्मपुढाऱ्यांनी त्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यासाठी साळसूदपणाचे सोंग घेतलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला विचारले की, “कैसरला पट्टी  ( कर )  देणे आम्हाला योग्य आहे की नाही. तेव्हा त्याने त्यांचे कपट ओळखले व त्यांना त्याने एक रुपया मागितला व विचारले यावर कोणाचा मुखवटा व लेख आहे? मग ते म्हणाले कैसरचा. यावर तो म्हणाला जे कैसरचे आहे ते कैसरला द्या व जे देवाचे आहे ते देवाला द्या. यावरून स्पष्ट होते की प्रभू येशूने कधीच अराजकता माजेल अशा प्रकारची शिकवण दिली नव्हती.

येशू ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासे घेऊन पाच हजार पुरुष्यांना जेवू  घातले स्रिया व मुले वेगळी होती, तेव्हा त्या जनसमुदायाला समजून आले की, ‘जगात येणारा भविष्यवादी हाच आहे. हे लोक आपणाला राजा बनवण्यासाठी आग्रही असल्याचे जाणून तो त्यांच्यातून निघून एकटाच डोंगरावर गेला. या वरून हे हि स्पष्ट होते की येशूला या जगाचे  राजपण कवडीमोल होते. योहान ६:१४-१५.

यहुदी धर्मगुरूंच्या आरोपावरून पिलाताने प्रभू येशूला विचारले की.” तू यहुद्यांचा राजा आहेस काय ? या वर प्रभूयेशुने काहीच बाजू न मांडता त्याला उत्तर दिले की, “तू म्हणतोस तसेच.” यावरून पिलाताला समजले की हा मनुष्य निर्दोष आहे. तसे त्याने मुख्य याजक व जणसमुदायाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ते जोर देऊन सांगत होते की या माणसाने गालीलापासून येथपर्यंत सर्व यहूदीयात लोकांना चिथावत आहे. यावरून प्रभू येशू ख्रिस्त गालील प्रांतातील आहे हे त्याला समजले. हा प्रांत हेरोदाच्या अधिकाराखाली असल्यामुळे त्याने त्याला हेरोदकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.

प्रभू येशूला पिलाताकडे पाठवण्याचा निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरित होता. पिलात व हेरोद यांच्यात वैर होते. वल्हांडणाच्या सणाच्या निमित्ताने हेरोद सुध्दा येरुशलेमेत आला होता. पिलाताने विचार केला की, येशू ख्रिस्त निर्दोष आहे खरा पण त्याला मुक्त करणे कठीण आहे. कारण त्याला यहुदी धर्मसत्तेचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने प्रभू येशूला हेरोदाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. हेरोद जो काही निर्णय देईल त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतील व आपण ह्या खटल्या पासून वाचू व त्याच बरोबर यामुळे हेरोदाला आपण मान  देत आहोत असे दाखवून खुश करता येईल. पिलातला या मध्ये काही प्रमाणात यश मिळाले असे म्हणता येईल कारण याच दिवशी हेरोद व पिलात मित्र झाले या पूर्वी त्यांचे आपसात वैर होते.

हेरोदा समोर चौकशी: प्रभू येशूला हेरोदासमोर घेऊन जातात तेव्हा तो त्याला पाहून विचित्र वागला त्याने त्याच्या खटल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तो ख्रिस्ताकडून काही चमत्काराची अपेक्षा करू लागला त्याला त्याने खूप प्रश्न विचाले परंतु प्रभू येशूने त्याला काहीच उत्तर दिले नाही. या दरम्यान मुख्य याजक व शास्त्री प्रभू येशूवर मोठ्या आवेशाने आरोप करीत राहिले परंतु प्रभू येशू काहीच प्रतिक्रिया करीत नाही हे पाहून हेरोद व त्याच्या शिपायांनी  त्याचा धिक्कार करीत थट्टा केली, व त्याला भडक रंगाची वस्रे घालून पुन्हा पिलाताकडे पाठवले. या वरून हे स्पष्ट होते की सैतानाने न्याय व्यवस्थेतील सर्वच माणसांना विवेक शून्य केले होते.

पुन्हा पिलाता समोर चौकशी व विचित्र निकाल : प्रभू येशूला पुन्हा पिलाता समोर उपस्थित केले गेले तेव्हा पिलाताने मुख्य याजक व शास्त्रींना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही जे आरोप प्रभू येशूवर करीत आहात ते सर्व खोटे आहेत. हेरोदाला व मला त्याच्यामध्ये काहीच अपराध सापडला नाही, त्याने मरणदंडास पात्र असे काहीही केले नाही. म्हणून त्याला फटके मारून मी सोडून देतो. आणि तसेही आपल्या परंपरेनुसार तुमच्यासाठी या सणात एका कैद्याला सोडण्याची प्रथा आहे. परंतु धर्मपुढारी व जनसमुदाय यांचा ताबा सैतानाने घेतलेला असल्यामुळे ते न्याय असे काहीच समजू शकत नव्हते. ते म्हणाले अशी प्रथा आहे तर तुम्ही आम्हासाठी दंगेखोर व खुनी बारब्बाला सोडा.पिलाताने त्यांना पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकेनात त्यांनी प्रभू येशूला वधस्तंभी खिळण्याचा आग्रह धरला. या सर्व घटनाक्रमातून असे दिसून येत होते की जणू सैतान प्रभू येशूला दाखवून देण्याचा प्रयत्न करीत होता की, येशू ख्रिस्ता तू कोणाचे तारण करण्यासाठी, कोणाला न्यायी ठरवण्यासाठी, इतक्या समर्पित वृत्तीने मरणास तयार आहेस. ते तुझ्यासारख्या नीतिमानावर नाही तर बरब्बा सारख्या अनीतिमानावर प्रेम करतात, ज्यांच्यासाठी तू इतके काही सहन केले तेच तुझा तुझ्या तोंडावर धिक्कार करत आहेत, तुझे शिष्य तुला नाकारीत आहेत, तू त्यांच्या तारणासाठी त्यांना नीतिमान ठरवण्यासाठी मेलास तरी ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. परंतु खरोखर देवाचे वचन आम्हास सांगते की, देव आम्हांवरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की, आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हांसाठी मरण पावला. रोम : ५:८. त्याने सर्व काही सहन केले यासाठी की मानवाच्या पतनास सैतान कारणीभूत आहे हे सिध्द व्हावे व मानव नीतिमान व देव इच्छेला समर्पित जीवन जगू शकतो हे सिध्द व्हावे.

सात शब्दांवरील संदेश ऐकताना आपण हे लक्षात घ्यावे की, हे सात शब्द देवाची आमच्यावरील प्रीती, ख्रिस्ती जीवनाची उच्चतम मूल्ये, त्याचे सामर्थ्य व अधिकार आम्हाला प्रगट करून दाखवतात यासाठी की आम्ही आपल्या तारणाऱ्यावर पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तीने प्रेम करावे. पण जर आपल्याला हे शब्द समजून घ्यायचे असतील तर प्रथम आपल्याला त्याच्या हृदयाशी एकरूप व्हावे लागेल. आपली सर्व बौध्दिक क्षमता बाजूला ठेऊन त्याचे हृदय काय बोलत आहे हे ऐकावे लागेल.

पहिला शब्द : (क्षमेचा शब्द) हे बापा यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. लूक २३:३४. 

क्षमा हा शब्द ख्रिस्ती जीवनाचे, किंवा आपण म्हणू शकतो की; देव राज्याचे उच्चतम मूल्ये प्रगट करणारा शब्द आहे. या शब्दाद्वारे देव पित्याची आमच्यावरील आगापे प्रीती व सर्वज्ञता दिसून येते. येथे आपण काही मुद्दे समजून घेऊ या.

१} ख्रिस्ताची सर्वज्ञता: प्रभू येशू त्याच्याबरोबर काय होत आहे हे जाणत होता, त्याचा मृत्यू, त्याचे पुरल्याजाने व तिसऱ्या दिवशी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत होणे त्याला ह्या सर्व गोष्टी त्याला माहित होत्या. त्याचबरोबर त्याला हे हि माहित होते की त्याच्याशी धोकेबाजी करणारे, गैरवर्तन करणारे हे सर्व सैतानाच्या सत्तेच्या आधींन आहेत. गेथशेमाने बागेत जेव्हा त्याने स्वतःला मुख्य याजक, शास्त्रीं व त्यांचा समुदाय यांच्या स्वाधीन स्वतःला केले तेव्हा तो म्हणाला, ” मी दररोज मंदिरात तुमच्यापुढे होतो, तेव्हा तुम्ही माझ्या विरुद्ध आपले हात पुढे केले नाहीत; परंतु हि तुमची घटका व अंधाराची सत्ता आहे. लूक २२:५३.

अर्थात यामुळे मुख्य याजक व शास्त्रीं निरापराध आहेत असे नाही, कारण सैतानाला त्यांनी आपल्या जीवनात कार्यकरण्यास संधी दिली होती. त्यांच्या जीवनातील जगिक मोह, राजकीय, सामाजिक व आर्थिक फायदे त्यांना देव इच्छेपेक्षा अधिक महत्वाचे वाटल्यामुळे ते पापाच्या अंधारात सैतानाच्या अंकित झाले होते. याचे चांगले उदाहरण यहूदा इस्कयोरत आहे. लूक २२:३-४ सांगते की त्याच्यात सैतान शिरला व त्याने प्रभूंयेशुला धरून देऊन पैसा कमवण्यासाठी मुख्य याजक व शास्त्रीं यांच्याशी करार केला. येथे एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे ती हि की, यहूदा हा सामान्य व्यक्ती नव्हता तो ख्रिस्ताचा शिष्य होता, त्याला प्रत्येक्ष ख्रिस्त शिक्षण देत असे, ख्रिस्ता कडून त्याला सैतानी शक्तींवर सामर्थ्य व अधिकार प्राप्त होता. ख्रिस्ताचे सर्व गौरव पाहणारा व अनुभवणारा असा तो होता. तरीही सैतान त्याला जिंकू शकला कारण त्याच्याही जीवनात मुख्य याजक व शास्त्रींन प्रमाणे राजकीय, आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे मोह होते. योहान १२:६-७ सांगते, “तो चोर होता व त्याच्या जवळ कसणी होती आणि तीत जे घालीत असत तें तो घेऊन जात असे.” सत्ता नावलौकिक मिळवण्यासाठी लोक आजही पैश्याच्या मागे धावताना आपण पाहतो त्यामुळे ते अंधाराच्या सत्तेच्या अधीन होतात व सैतान त्यांचा हवा तसा उपयोग करतो.

खरोखर माणसे काय करतात हे त्यांना कळत नाही सैतान त्यांची मन आंधळी करितो. अनुवाद २१:१-९ सांगते, की मनुष्य रक्तपाताच्या दोषापासून तेंव्हाच मुक्त असतो जेव्हा त्याने तो अपराध केला नसेल व तो अपराध होताना पाहिला नसेल. याचा अर्थ खून करणारा दोषी असतोच पण खून होताना बघ्याची भूमिका घेणारा देखील दोषी असतो. या वचनाच्या प्रकाशात जर आपण ख्रिस्ताच्या रक्ताविषयी पिलाताच्या हात धुतले या क्रियेला समजून घेतले तर असे लक्षात येते की, पिलात फक्त हात धुवून या रक्तपाताच्या दोषातून मुक्त होणार नव्हता कारण वचन सांगते की रक्तपात होताना बघ्याची भूमिका घेणारा सुध्दा रक्तपाताच्या दोषाचा भागी असतो. येथेतर पिलाताने त्याच्या हाती प्रभू येशूला वाचवण्याचे सामर्थ्य व अधिकार असताही जनसमुदायाच्या दबावाला बळी पडत विपरीत न्याय केला. त्याच प्रमाणे धर्मगुरू व येरुशलेमेतील जनसमुदाय इतका यिरेस पेटला की आपण काय करत आहोत याचे त्यांना भान राहिले नाही व पिलातावर दबाव वाढवण्यासाठी ते म्हणाले की, त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या लेकरांवर असो मत्तय २७:२५. सैतानाच्या हाती असलेल्या या लोकांचा न्याय पुढे कसा होणार हे प्रभू येशू पहात होता.

धर्मपुढाऱ्यांच्या पापांचे परिणाम काय होणार होते हे त्याला माहित होते. वधस्तंभाच्या वाटेवरून जात असताना काही स्रिया त्याच्यामागे उर बडवून घेत शोक करीत चालल्या असता तो त्यांना उद्देशून म्हणतो, अहो येरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही आपणासाठी व आपल्या लेकरांसाठी रडा. लूक २३:२७-३१.

आणि आपण पाहतो की, इ.स.७० मध्ये यहुद्यांच्या न्यायाची सुरुवात झाली. रोमन जेनरल टायटस याने वेढा दिला व संपूर्ण येरुशलेम व मंदिर उध्वस्त केले. येरुशलेमेची रस्ते मृतांनी भरून गेले या घटनेचे विस्तृत वर्णन  यहुदी इतिहासकार जोसेफस याने ज्यूस वॉर या पुस्तकात केले आहे. पुढे पृथ्वीच्या पाठीवर यहुदी पांगल्यागेले. ठिकठिकाणी त्यांचा छळ झाला, दुय्यम दर्जाची वागणूक, आर्थिक शोषण व हजारो लाखोंच्या संख्येत नरसंहार हे यहुद्यांसाठी नेहमीचे झाले होते, शेवटी यहुद्यांचा भीषण छळ हिटलरने केला, १९४१-४५ दरम्यान जर्मनीत सहा लाख यहुद्यांचा नरसंहार केला गेला. जवळ जवळ १९०० वर्षांचा हा काळ आहे. प्रभू येशू हे सर्व आत्मिक दृष्टीने त्याच्या सर्वज्ञांनी सामर्थ्याने पहात होता व म्हणून तो प्रार्थना करीत होता की हे बापा यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही. प्रभूने प्रार्थना केली परंतु त्यांचा न्याय टळणारा नव्हता.
देव राज्याची मूल्ये व ख्रिस्ताचे बापपण: आपण पहिले की ख्रिस्त त्याच्या सर्वज्ञानाच्या सामर्थ्याने यहुद्यांवर येणारा भयंकर न्याय पहात होता. तरी त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना त्याने  का करावी? कारण संदेष्ट्यांचा घात करणारी, देवाच्या आज्ञांचा विपरीत अर्थ काढून मनमानील तसे नियम करून सर्वसामन्यांचे शोषण करणारे हे राष्ट्र होते. मत्तय २३: ३५-३९. आणि तो स्वतः आता त्याचा अतोनात छळ सहन करीत असता त्याने या लोकांसाठी क्षमेची प्रार्थना का करावी ? आपल्यावर मरणप्राय घाव घालणाऱ्यांवर दया व्हावी अशी कोण इच्छा बाळगील? परंतु हे ख्रिस्ताने केले, त्याने आपल्याला यातना देणाऱ्यांच्या भविष्यातील यातना पाहिल्या व त्याचे त्यांना क्लेश होऊ नयेत यासाठी प्रार्थना केली याचे दोन प्रमुख करणे आहेत.
एक म्हणजे देवराज्याची मूल्ये व दुसरे म्हणजे तो मानवाचा निर्माणकर्ता बाप आहे. मत्तय ५:४३-४५ सांगते,”तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, परंतु मी तुम्हांस सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपला बाप जो आकाशात आहे त्याचे मुलगे व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवरही आपला सूर्य उगववितो आणि न्यायी व अन्यायींवरही पाऊस पाडतो. हि देवराज्याची मूल्ये शिकवणारा ख्रिस्त स्वतः येथे आचरणातून दाखवत आहे.
दुसरे असे की बाप म्हणून त्याची मानवांवर आगापे म्हणजे निरपेक्ष प्रीती आहे. जगिक आई बापांच्या उदारणावरून आपण त्याची प्रीती समजू शकत नाही. देवाचे वचन सांगते, “कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता त्या आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल काय ? होय, त्या कदाचित विसरतील पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी आपल्या तळहातावर तुला कोरले आहे; तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत. यशया ४९: १५-१६. प्रभूचे अभिवचन किती सत्य आहे, पापात पडलेल्या आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी आपला प्राण देण्यास मागेपुढे न पाहणारा हा बाप स्वतः प्राणांतिक यातना सहन करीत असताही, त्यांच्या बद्दल कळवळ्याने भरून, प्रार्थना करीत आहे. ख्रिस्त आपल्यावरील  प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मरण पावला.
प्रार्थना: हे प्रभू येशू मी पापी असता तू माझ्यासाठी मृत्यू पावला. तुझी  आगपे प्रीती मला समजुदे. मी हि क्षमाशील जीवन जगून तुला गौरव द्यावे असे सामर्थ्य मला दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.
 
============================================
 
दुसरा शब्द : (तारणाचा शब्द) मी तुला नक्की सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकांत असशील. लूक २३:४३. 
 

प्रस्तावना :

प्रभू येशूने वधस्तंभावरून उच्चारलेला हा दुसरा शब्द. हा तारणाचा शब्द आहे. प्रभू येशूचे सार्वभौमत्व ह्या शब्दाद्वारे प्रगट होते. प्रभू येशूला दोन चोरांच्या मध्ये वधस्तंभावर खिळण्यात आले, तेव्हा येशूने त्याचा छळ करणाऱ्यांसाठी मध्यस्थी केली की हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करत आहेत हे यांना कळत नाही. खरोखर हे माणसं काय करत होती हे त्यांना कळत नव्हते. त्यांना सैतानाने पूर्णपणे आपल्या अंकित केले होते. कारण त्यां नी प्रभू येशूच्या त्या प्रार्थनेवर काहीच विचार केला नाही. उलट त्यांनी त्याची वस्रे वाटून घेताना चिठ्या टाकल्या. लोक पहात होते अधिकारी त्याचा उपहास करीत होते. याने दुसऱ्यांना तारले, स्वतःला देवाचा ख्रिस्त म्हणतो, हा खरोखर निवडलेला आहे तर त्याने स्वतःला तारावे. शिपायांनी त्याच्या जवळ आंब नेऊन त्याची थट्टा केली, व म्हणाले तू यहुद्यांचा राजा आहेस तर स्वतःला तार. हा यहुद्यांचा राजा आहे असा लेखही त्या ठिकाणी लावण्यात आला होता. प्रभू येशूने चिडून जावून आपले  सामर्थ्य प्रगट करून स्वतःला सोडवावे व देव इच्छेपासून परावृत्त व्हावे हि सैतानाची इच्छा होती पण प्रभू येशू शांतपणे सैतानाच्या प्रत्येक पाशाचा मोड करीत देव राज्याचे उच्च मूल्ये, सामर्थ्य व अधिकार प्रगट करीत होता.

प्रभू येशूची हि निंदा चालू असताना त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळलेल्या एका चोराचा उपयोग सैतान करू लागला. हा चोर कावेबाज वृत्तीने पेटला व ख्रिस्ताची निंदा करू लागला. तो इतरांपेक्षा त्याच्या अधिक जवळ व समान उंचीवर असल्यामुळे ख्रिस्ताशी सहज संवाद साधू शकेल व त्याच्या यातना तो समजून तो विद्रोह करीन असा हेतू या मागे सैतानाचा असावा. परंतु सैतानाला मर्यादा आहेत तो पृथ्वीवरील सर्वांचाच उपयोग करून अंधाराचे राज्य चालवू शकत नाही, हेच येथे सिद्ध झाले. दुसऱ्या चोराने त्याच्या जोडीदाराच्या वागण्याचा निषेध केला. आयुष्यभर नैतिक मूल्यांची भीड न बाळगणारा हा चोर आज येथे आपला प्राण वाचावा म्हणून आपल्या सोबत्याची रि ओढत नाही तर त्याचा निषेध करीत आहे. प्रभूचा न्याय करणाऱ्यांच्या पुढे, प्रभूच्या बाजूने बोलत आहे. प्रभू निर्दोष आहे असे ठामपणे त्या सोबत्याला व उपस्थित जनसमुदायाला ऐकवत आहे. स्वतःच्या व आपल्या सोबत्याच्या  मृत्यूदंडाचे समर्थन करताना तो म्हणतो आपण तर आपल्या कर्माप्रमाणे शिक्षा भोगीत आहोत पण ह्याने अयोग्य असे काहीच केले नाही. हे बोलत असता त्याच्या अंतःकरणात त्याला नक्कीच वाटले असावे की हाच ख्रिस्त आहे जो मानवाच्या तारणासाठी अर्पिला जाणारा देवाचा कोकरा आहे. याच्या द्वारे माझा नक्की उध्दार होणार. म्हणूनच तो म्हणतो, हे येशू, तूं आपल्या राज्यांत येशील तेव्हा माझी आठवण कर. तेव्हा प्रभू येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकांत असशील.
विश्वास ठेवून ख्रिस्ताला शरण गेले तरच उध्दार: स्वाभाविकपणे आपण असा विचार करू शकतो की, आयुष्यभर चोऱ्यामाऱ्या करणारा पापी व्यक्ती मृत्यूच्या शेवटच्या क्षणी असा कसा काय तारल्या जावू शकतो. देवाचे वचन आम्हाला सत्य उलगडून सांगते की, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोमन ३:२३. आज्ञाभंगाच्या मूळपापा मुळे मानव शापित झाला आहे. योग्य कर्म त्याच्या हातून होत नाही. नियमशास्त्राद्वारे त्याच शापितपण कळून येते. अगदी जन्मापासून माणसाच्या स्वभावात स्वार्थ, राग, द्वेषादी, दैहिक विकृतींचे अस्तित्व असते, कारण आद्य मानवांनी केलेल्या आज्ञाभंगाच्या पापाचे ते परिणाम आहेत. त्यामुळे चोर म्हणजे पापी व धर्मगुरू म्हणजे पुण्यवान असा निकष लावता येत नाही. तरी जगात बहुतेक सामाजिक व्यवस्थांमध्ये असाच निकष लावला जातो की जर कोणी काही अनुचित कृत्य करील तर ते पाप. परंतु खरे पहाता प्रत्येक व्यक्ती काहींना काही पाप करीतच असतो,”सापडलातर चोर नाही तर साव.”  त्यामुळे कोणीही कर्ममार्गाची बढाई मारू नये. धर्माने अनेक नियम घालून दिले आहेत पण ते नियम आम्हाला आरसा आहेत. आरश्यात पाहिले म्हणजे दिसते की आपण कसे आहोत, त्याप्रमाणे धर्मशास्रातले नियम वाचले की कळते आपण पापी आहोत ते. कारण त्यातील अनेक नियम आपण योग्य प्रकारे पाळलेले नसतात. अर्थात सर्वच पाप करतात म्हणून पापी जीवनाचे समर्थन केले जावू शकत नाही, देवाचे वचन सांगते, पापाचे वेतन मरण आहे, येथे जे मरण अधोरेखित केले आहे ते म्हणजे आत्मिक मरण, युगांयुगाच्या नरक यातना.
यातून मानवाला मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, मानवी स्वभावाच्या कोणत्याच विकृतीचे दर्शन त्याच्या जीवनात नव्हते, तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी स्त्रीच्या पोटी जन्मास आला असल्यामुळे, प्रथम मानवाच्या आज्ञाभंगाच्या पापापासून मुक्त होता. प्रथम मानवाने आज्ञाभंगाचे पाप केल्यामुळे, त्यांच्याद्वारे अनुवंशिकतेने पापाचा दोष मानवाच्या सर्व पिढ्यात वाढत गेला, मानवाच्या हातून जे घडले त्याचे प्रतिफळ त्याला मिळत गेले, परंतु ह्या सगळ्याला खरा जबाबदार सैतान होता. देवाला हे सिध्द करून मानवाचा उध्दार करावयाचा होता व सैतानाला दोषपात्र ठरवून त्याची नियुक्त वेळ आल्यावर त्याचा नाश करावयाचा होता.
हे कार्य स्वतः देवाने आपल्या हाती घेतले होते, मानव होऊन तो या जगात प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने अवतरला होता. मानव मृत्यूपर्यंत देव इच्छेला समर्पित राहू शकतो याचे सप्रमाण उदाहरण म्हणजे त्याचे निष्पाप असे क्रुसावरील मरण व सैतान मानवाच्या पतनास कारणीभूत असल्याचे सिध्द करते. ख्रिस्ता द्वारे मिळणारे हे तारण म्हणजे ( मुक्ती ) हि वाहणाऱ्या अथांग सागरा प्रमाणे आहे. गरज आहे ती या ख्रिस्त रुपी तारण दुर्गाकडे जाण्याची. त्याचे तारण अगदी समीप आहे. जसा तो त्या दोन चोरांच्या मध्ये निराधार टांगला गेला होता, त्यांच्या अगदी जवळ होता, जगासाठी तो त्यांच्यातला एक होता. तरी तो तसा नव्हता तर पापात मरणाऱ्या त्या दोघांनाही तारण्यास समर्थ होता, कारण ती दोघे तर त्यांच्या कर्माचे फळ जे त्यांना जगिक न्याय व्यवस्थेकडून मिळाले होते ते भोगीत होते, ख्रिस्त मात्र या जगिक न्याय व्यवस्थेचा व तिचा चालक सैतान यांचा न्याय करीत होता. त्यांचे विकृत स्वरूप उघड होत होते. धर्मसत्ता, राज्यसत्ता व न्याय व्यवस्था ज्यांनी स्वतःला देवा समान उंच करण्याचा प्रयत्न केला होता त्या कशा पापात व सैतानाच्या अधिपत्त्या खाली आहेत हे ख्रिस्त सिध्द करीत होता. देवाचे वचन सांगते, त्याने त्या वधस्तंभावर सत्तास, अधिकाऱ्यांस नाडून घेऊन त्यांचे उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवला, कल २:१५.
ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण प्रथम मानवाने केलेल्या आज्ञाभंगाच्या पापाला सैतान कारणीभूत असल्याचे सिध्द करते व त्याच बरोबर समस्त मानवाला त्याच्या शापित जीवनाचा अंतर्मुख होऊन विचार करावयास भाग पाडते. जो कोणी स्वतःची हि खरी शापित अवस्था समजून घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जातो त्याचे तारण होते. येथे भेद नाही परंतु देवाच्या कृपेचा भाग आहे देवाची कृपा या दोन्हीं चोरांवर झाली. दोघांनीही प्रभू येशूला म्हटले असते की आम्हांवर दया कर व  तूं आपल्या राज्यांत येशील तेव्हा आमची आठवण कर.तर प्रभूने दोघांनाही म्हटले असते की तुम्ही आज मजबरोबर सुखलोकात असाल, परंतु एकाने देवाची कृपा स्वीकारली नाही, दुसऱ्याने ती स्वीकारली त्यामुळे त्याचा सद्सदविवेक भाव जागृत झाला, व ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाला त्याच्या उध्दाराचे प्रायश्चित असे त्याने समजून घेतले. त्यामुळे तो ख्रिस्ताला शरण गेला, व त्याला सुखलोक प्राप्त झाले.
 
हि देवाची व्यवस्था आहे: प्रभू येशू ख्रिस्त शेवट पर्यंत देव इच्छेला समर्पित राहिला. त्याने मृत्यूला स्वीकारले परंतु देव इच्छा उल्लंघण्याचे पाप केले नाही. म्हणून मृत्यूची द्वारे त्याला अडवू शकली नाहीत. तो मृत्युजंय झाला व देव पित्याच्या उजव्या बाजूस बसला. देव पित्याने त्याच्याहाती सर्व अधिकार दिले. पवित्र वचन सांगते की, ” देवाने ख्रिस्ताच्याठायी ती करणी करून दाखवली आहे, त्याने त्याला मेलेल्यातून उठवले, आणि त्याला स्वर्गात आपल्या उजवीकडे स्वर्गामध्ये बसवले, सर्व सत्ता व अधिकार व सामर्थ्य व धनीपण यांपेक्षा व प्रत्येक नाव, जे या काळी ठेवलेले आहे तेंच केवळ नव्हे, तर येणाऱ्या काळीही ठेवण्यात येईल त्यापेक्षाही त्याने त्याला फार उंच करून बसवले आणि त्याने त्याच्या पायांखाली सर्व वस्तू अधीन केल्या, आणि त्याला सर्वावर मंडळींचा मस्तक होण्यासाठी दिले.” इफिस १: २०-२३.
 
दोन्हीं चोरांच्या बाबतीत जे घडले ते आपल्याला उदाहरणा दाखल आहे. मुक्ती, तारण, स्वर्ग, सुखलोक हे शब्द बऱ्याच अर्थाने समानार्थी आहेत. जर माणसाला मुक्ती, तारण, सुखलोक, किंवा स्वर्ग पाहिजे असेल तर ते कर्मकांडाने पुण्य कमावून मिळणार नाही. तर प्रभू येशूला शरण गेल्याने मिळेल. कारण देवाने प्रभू येशूच्या द्वारे मानवाला उध्दाराचा मार्ग घालून दिला आहे. मार्ग जीवन व सत्य प्रभू येशू आहे त्याच्या द्वारेच स्वर्गाचे दार उघडते अन्यथा नाही . योहान १४:६.
प्रार्थना : हे प्रभू तूच उद्धाराचा श्रोत आहेस हे सर्व मानव जातीस कळूदे व त्यांनी तुला जीवन अर्पण करून त्यांना स्वर्ग मिळेल असे होऊदे . येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक आमेन.
 
============================================
 
तिसरा शब्द : (दैवी नाते स्थापित करणारा शब्द) बाई पहा हा तुझा पुत्र ! मग त्याने शिष्याला म्हटले, पहा हि तुझी आई ! योहान १९ :२५-२७ 
 
 
 
प्रस्तावना: हा शब्द दैवी नाते स्थापित करणारा आहे. हे नाते देवाच्या प्रीतीद्वारे व त्याच्यामध्ये मिळालेल्या नवीन जीवनातून स्थापित झाले आहे. हे दैवी नाते मंडळीतील प्रीती, ऐक्य व आत्मिक कर्तव्य दाखवते. जसे एका कुटूंबात आई, वडील, बहीण, भाऊ हे पवित्र नाते व त्यांचा एकमेकांवर असलेला हक्क व एकमेकांप्रती असलेले कर्तव्य आपल्याला समजते. तसे मंडळीत सुध्दा आपल्याला आत्मिक आई, वडील, बहीण, व भाऊ दिले आहेत. त्यांनी एका कुटुंबासारखे रहावे हे अपेक्षित आहे. या दैवी नात्यांची स्थापना ख्रिस्ताने आपल्या शिष्यावर आपल्या आईची जबाबदारी मोठ्या हक्काने देऊन केली.
हे दैवी नाते स्थापित करतांना कोण कोणकोणत्या गोष्टी येशू ख्रिस्ताला अभिप्रित असाव्यात हे आपण पवित्र शास्राच्या संदर्भांवरून समजून घेऊ शकतो.
 
दहा आज्ञांपैकी एक महत्वाची आज्ञा : निर्गम २०:१२ सांगते, “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. आपली आई त्याठिकाणी दुःखाच्या सागरात व्याकुळ असताना, तिचा हा पुत्र तिचे सांत्वन कसे करणार होता. आईला पुत्र पेक्षा प्रिय काय असणार. आपल्या पुत्राची झालेली दशा पाहून, तिचा तिचा उठणारा टाहो कशाने शांत होणार. तिला तिच्या जीवाची किंवा तिच्या भविष्याची नाही तर आपल्या पुत्राची  झालेली दशा पाहून काय वाटत असणार ? याचा आपण विचारही करू शकत नाही.
दुसऱ्या बाजूला क्रुसावर टांगलेली हि विश्व माउली, मानव जातीला म्हणजे आपल्या लेकरांना पापाच्या झालेल्या विष बाधे पासून तारण्यासाठी मरण स्वीकारत आहे. ती आपल्या आई मरियेचे सांत्वन कसे करणार? कसे सांगणार की आई हा मृत्यूचा प्याला मी पित आहे कारण मला माझ्या लेकरांना पापाच्या भयानक मृत्यूपासून तारायचे आहे.
आपल्याला  दोन्ही बाजूला मातृत्वाच्या  व पितृत्वाच्या प्रीतीचे  व त्यागाचे अद्भुत दर्शन या ठिकाणी होत आहे. माता मारिया हि येशूची आई आणि वडील दोन्ही आहे. व प्रभू येशू या विश्वाचा पिता आणि आई दोन्ही आहे. दोघांच्या ठायी मातृत्व व पितृत्व भरून वाहत आहे. पवित्रतेचे हे अद्भुत दर्शन आहे. आणि म्हणूनच देवाने मोशेला दहा आज्ञा देताना हि एक आज्ञा दिली व हि आज्ञा पाळणाऱ्याला कल्याणकारी आशीर्वाद दिला, की, “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.निर्गम २०:१२. बायबल आपल्याला आई वडिलांना सांभाळण्यास त्यांचा मान राखण्यास शिकवते. तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे. लेवीय १९:३ . तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या पित्याचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल. अनु ५:१६. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” (अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे).बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. इफिस ६:१-३.
हि आज्ञा न पाळणाऱ्याला देव भयानक शिक्षा देण्यास सांगतो, “कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी”. मत्तय  १५:४.  
ख्रिस्त क्रुसावर मरणप्राय वेदना सहन करत असताना, आपल्या आईच्या सांत्वनासाठी प्रयत्न करतो. हि त्याची कृती आम्हांला आई वडिलांच्या प्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करून देते.
स्थानिक मंडळी व जागतिक मंडळी हि स्वर्ग राज्याचे प्रतिरूप आहे: प्रियांनो या जगात कोणी कोणाचे नाही. प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो. देवाचे वचन सांगते शेवटच्या काळात प्रीती थंडावेल, मत्तय २४: १२. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.त्यांच्यापासूनही दूर राहा. २ तिमोथी ३:१-५.
हि जगाची स्थिती आहे पण आपण या जगात अंधारात मार्ग दाखवणारा प्रकाश आहोत. देवाचे लोक म्हणजे, उद्गार पावलेले लोक, नवीन जन्म पावलेले लोक, एक प्रभू, एक बाप्तिस्मा, व एकच पवित्र आत्मा पावलेले आहेत. इफिस ४:४-६  त्यांच्यात भेद नाहीत. वचन सांगते, “कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात; गलती ३: २६-२८.
हे जीवन येरुशलेमेतील व अन्तुखियातील मंडळीत आपण पाहतो, ते त्यांनी ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त केले होते. तसे आपणही ऐक्यात व प्रीतीत वाढत देवाचे गौरव करावे. प्रेषित २ :४२-४७  आणि प्रेषित ११:२६-३०.
प्रार्थना :
 
============================================
 
चौथा शब्द :मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारुन बोलला, एली, एली, लमा सबख्थनी? म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” (मत्तय 27:45-46).
 
प्रस्तावना : यहुद्यांच्या पारंपरिक मान्यतेनुसार दिवसाची सुरवात सकाळी सहा वाजता होते. म्हणजे सकाळचे  “सहा” हा पहिला तास. बायबल आपल्याला सांगते, दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासांपर्यंत देशात अंधार पडला. याचा अर्थ दुपारी बारा वाजल्या पासून तीन वाजे पर्यंतची हि वेळ आहे. अभ्यासकांच्या मते येशू दुपारी बारा वाजल्या पासून तीन वाजे पर्यंत वधस्तंभावर जिवंत होता. भरदुपारी अंधार पडणे हि देवाची असंतोषाची खुन आहे. “प्रभू परमेश्वर म्हणतो,“त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन.
आमोस 8:9
प्रभू येशूच्या जीवनातील हा समय अतिशय अंधकारमय आहे. संपूर्ण मानवजातीचे पाप व श्राप त्याच्यावर लादल्या गेले आहेत. बायबल सांगते, ” प्रभू येशू तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. यशया ५३:३-६.
प्रभू येशू आमच्या पापासाठी प्रायश्चित्त करण्यासाठी या जगात आला होता. योहान त्याला पाहून म्हणाला होता, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” योहान १:२९. जुन्या करारात “कोकरा” मनुष्याच्या पाप क्षमेसाठी अर्पण केला जाई लेवीय ४ :३२.
आता हा तो क्षण होता जेव्हा देवाचा कोकरा प्रभू येशू संपूर्ण मानवजातीच्या पापक्षमेसाठी अर्पिला जात होता. येथे त्याला अर्पिल्या जाने आवश्यक होते, येथे पित्याला  त्याच्या त्याग करणे आवश्यक होते. आणि प्रभू येशू ह्या बद्दल पूर्ण पणे जाणून होता. वेळ आल्यावर त्याने स्वतःचे समर्पण या साठी केले होते. मत्तय २६:३९ ,४ २, सांगते, “मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”आणखी त्याने दुसर्‍यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” पुढे मार्क १४:३६, व लूक २२ :४२ मध्ये  प्रभू येशूची हीच प्रार्थना व हेच समर्पण आपण पाहतो. देवानेही त्याची प्रार्थना ऐकली व आपली इच्छा त्याला प्रगट केली. लूक २२:४४ सांगते की, देवाने त्याचा प्याला काढून घेतला नाही परंतु त्याला तो प्याला पिण्यासाठी अधिक सामर्थ्य दिले.
प्रभू येशूने स्वतःचे समर्पण देवाच्या इच्छेस केले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्‍यांपुढे गप्प राहणार्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? यशया ५३:७-८. त्याने सर्व सहन केले, व आपल्या छळ करणाऱ्यास क्षमा मिळावी म्हणून प्रार्थना केली. पाप्यांचा त्याने क्रुसावर देखील द्वेष केला नाही,  अमानुषशिक्षेच्या मरणप्राय यातना सहन करीत असताही त्याने आपल्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्याची चित्तवृत्ती कधीच विचलित झाली नाही. परंतु , यावेळेस तो ओरडून म्हणत आहे, ” माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? 
याचा अर्थ क्रुसावरील यातना, अपमान, क्लेश आणि शापित मरण हा त्याच्यासाठी कडू प्याला नव्हता! परंतु पित्याकडून त्यागल्या जाणे, पित्याच्या संगतीपासून दुरावल्याजाने, पित्याची व त्याची सहभागिता नष्ट होणे, त्याच्या समक्षतेचा अभाव हा त्याच्यासाठी खऱ्याअर्थाने कडू प्याला होता. परंतु हे होणे आवश्यक असल्याने होणे निश्चित होते.
स्वयं अस्तित्वात असलेला त्र्यक्ये देव [पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा] यांचे एकत्व येथे पणाला लागले होते. हे एकत्व कधीच तुटले नव्हते. पुत्र आधीच या एकत्वाला मुकला नव्हता. त्याचे पृथ्वीवरील जीवन सुध्दा पित्याच्या इच्छेत व समक्षतेमध्ये होते. बायबल सांगते, “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
तोच प्रारंभी देवासह होता. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. योहान १:१-२,१४. प्रभू येशू म्हणतो, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो.” योहान ५:१९. 
याठिकाणी मात्र हि संगती तुटणार होती. आणि हे प्रभूसाठी अतिशय क्लेशकारक व असहनीय होते. याच आंतरिक वेदनेतून त्याने टाहो फोडला, ” माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? 
देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राचा त्याग का केला त्याचा आपण कधी विचार करतो का ? पुत्राने हा अत्यंत वेदनादायी प्याला का पिला याचा आपण कधी विचार करतो का ?  प्रियांनो, बायबल सांगते, “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६. “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.” २ करिंथ ५:२१ .
 
प्रार्थना : हे पित्या तू आम्हाला तारण्यासाठी आपल्या एकूलत्याएक पुत्राचा त्याग केला. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्यामध्ये मिळालेल्या जीवनासाठी तुझे आभार मानतो. आता आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून तू आमचे साहाय्य हो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक आमीन .
============================================
 
पाचवा शब्द: ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. योहान १९:२८ 
 
प्रस्तावना : जवळजवळ ८-९  तास प्रभू येशूचा छळ चालू होता. जवळजवळ सहा तास तो क्रुसाशी झुंज देत होता. या सर्व संघर्षात त्याच्या समोर एकच ध्येय होते आणि ते म्हणजे देवाच्या इच्छेला समर्पित राहून तारणाचे कार्य पूर्ण करायचे.
तहान हि मानवाची नैसर्गिक गरज आहे: या काळात त्याने पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. त्याच्या शरीरातील पाणी पूर्णपणे संपले होते. त्याची पाठ एकोणचाळीस चाबकाच्या फटक्यांची सोलून निघाली होती. त्याने जवळजवळ १२५-१५० किलो वजनाचा क्रूस वाहिला होता. त्याच्या हातापायात जाडसर खिळे ठोकले होते. डोक्यावर काट्याचा मुगुट ठेऊन त्यावर फटके मारल्यामुळे ते काटे त्याच्या डोक्यात रुतले होते व त्यातून रक्त वाहिले होते. शरीरात रक्त किंवा पाणी शिल्कक राहण्याचे कारण नव्हते. परंतु तो जाणून होता की त्याला भविष्यवाद्यांनी सांगितलेला प्रत्येक भविष्य संदेश पूर्ण करायचा होता. आता हा देवाचा कोकरा सर्व काही पूर्ण झालेले पाहून मानवाच्या तारणासाठी स्वअर्पणाचा तो विजय साजरा करणार होता. सैतानाच्या क्रूरतेचा मोठ्या धैर्याने सामनाकरीत या क्षणापर्यंत पोहचलेला प्रभू येशू दमलेला, भागलेला, थकलेला व तहानलेला आपण पाहतो. 
येशूच्या मानव असण्याबद्दल मतभेद : प्रभू येशूने उच्चारलेला हा उदगार त्याचे मानवत्व प्रगट करितो. त्याचा हा उच्चार सैतानाने पसरवलेल्या भ्रामक कल्पनांना उत्तर आहे. डोसेटिझम हि एक चुकीचे शिक्षण देणारी चळवळ होती जी दावा करीत असे कि येशू ख्रिस्त खऱ्या मानवी देहात नव्हता, तर त्याचे शरीर भूतसदृश किंवा प्रेत होते. त्यांचा असा विश्वास होता की भौतिक जग आणि मानवी शरीर हे मूळतः दुष्ट, पापी किंवा हीन आहेत. त्यांनी असा निष्कर्ष काढला की एक पवित्र, दैवी देव पापी देहात प्रवेश करू शकत नाही किंवा त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही.
परंतु बायबल सांगते, “शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.” योहान १ :१४.  येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’ लूक २ :५२.
आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली; तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;इब्री ५:७-८. 
त्याला मानवी शारीरिक गरजा होत्या,  ४० दिवसाच्या उपवासानंतर त्याला भूक लागली होती. भूक हि मानवी देहाची गरज आहे. तो थकत होता योहान ४ :६. त्याला झोपेची गरज होती, मार्क ४ :३८. 
त्याला मानवी भाव भावना होत्या, लाझरस साठी आणि येरुशलेमेसाठी तो रडला योहान ११ :३५, लूक १ :४१. खिन्नता व राग, मार्क ३ :५ आत्म्यात उल्हासीत झाला लूक  १ ० :२१. मत्तय २६: ३८ सांगते, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
त्याला प्रलोभनाचा सामना करावा लागला मत्तय ४:१५. मानवाप्रमाणे तो देवावर अवलंबून होता. लूक ५ :१६. 
यावरून हे स्पष्ट होते की, तो आपल्या तारणास्तव पूर्ण मानवाच्या रूपात त्या वधस्तंभावर मेला. असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला.
पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.
तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. १ करिंथ १५:४५, ४७-४८. 
भविष्य संदेश पूर्ण झाले: त्याला लागलेली तहान हि मानवी शरीराची गरज होती, त्याच प्रमाणे संदेष्ट्यांचे भविष्यसंदेस पूर्ण करणारी होती. स्तोत्र ६९:२१ व २२ :१५ 
विजयाचा शब्द उच्चारण्यासाठी त्याची ती गरज होती: स्तोत्र २२ :१५ सांगते, “माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.” हा भविष्य संदेश येथे खरा झाला. येशूला तहान लागली, त्याने आम घेतली व म्हणाला पूर्ण झाले. योहान १९:३०. 
तहानेचा प्रतीकात्मक अर्थ: मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” योहान ७:३७-३९. याचा अर्थ ख्रिस्ताला तहान लागली होती. तो स्वतः तहानलेला होऊन मानव जातीची आत्मिक तहान भागवत होता . त्याने मानवाला तारण देऊन त्याचे समाधान केले. 
आता आपण त्याची तहान भागवून त्याचे समाधान करावे. शमरोनी स्त्रीने येशू ख्रिस्ताला पाणी देऊन त्याची शारीरिक तहान भागवली, परंतु खऱ्या अर्थाने तो समाधान पावला जेव्हा तिने त्याला ओळखले व त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे तिच्या पापांची क्षमा तिला मिळाली व ती तारण पावली. 
आज जर आम्ही खरे साक्षीचे जीवन जगू व सुवार्तेचे कार्य करू व  अनेकांनी  येशूवर विश्वास ठेवून जर तारण प्राप्त केले तर त्याचे समाधान होऊन खऱ्याअर्थाने त्याची तहान भागेल. 
प्रार्थना : हे प्रभू तू मानवाला तारण्यासाठी तहानला . तरी आम्हांला कृपा करून साहाय्य कर की आम्ही खरे साक्षीचे जीवन जगावे व अनेकांच्या तारणासाठी कारण व्हावे. 
============================================
सहावा शब्द: येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. योहान १९ :३०
प्रस्तावना: आंब घेतल्यानंतर म्हणजे पाचव्या शब्दानंतर लगेचच हा शब्द प्रभू येशूने उच्चारला. हा शब्द विजयाचा शब्द आहे.  पृथ्वीवर येण्याचा त्याचा उद्देश पूर्ण झाला. मानवाला तारण्याचे त्याचे कार्य पूर्ण केल्याचा हा जयघोष आहे. 
नव्या कराराचा प्रारंभ या जयघोषात आहे, सदासर्वकाळासाठी मानवी उद्धारासाठी एकच परिपूर्ण अर्पण दिले गेले. इब्री १०:९ -१४ सांगते, “मग तो म्हणाला, “[हे देवा,] पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.” ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’ आणि तेव्हापासून ‘आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत’ वाट पाहत आहे. पुढे, याच अध्यायात बायबल सांगते,त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; इब्री १० :१९-२०. 
मानवाला नीतिमान ठरवून देवाशी जोडल्याचा हा विजयी जयघोष होता. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; रोम ५ :८-१ ० 
येशूचे पृथ्वीवरील मिशन व त्या संदर्भातील देवाचा मनोदय व्यक्त करणारी भविष्यवचने पूर्ण झाली होती: बायबल सांगते, “आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.इब्री ९:१२. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. फिलिप्पी २:८
आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्‍यांपुढे गप्प राहणार्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली; तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ स फल होईल.त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल; तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील;1 त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. यशया ५३. 
ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या मिशनचे महत्व समजा: आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला.रोम ५:६. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला; १ पेत्र ३ :१८. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
 प्रार्थना: हे प्रभू तू आम्हांला तारण्यासाठी आपल्या स्वतःला अर्पण केले. तू  आमच्यासाठी तारणाची कार्य पूर्ण केले म्हणून तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आम्हांला तुला अनुसरण्यास कृपा पुरव. 
============================================
सातवा शब्द: तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला.लूक २३: ४६ Jesus
प्रस्तावना: प्रभू येशूने तारणाची कार्य पूर्ण झाल्याचे विजयी वाक्य उच्चारल्यानंतर तो आपल्या स्वः अर्पणास तयार झाला. हे वाक्य त्याचा देवावरील अतूट विश्वास, संपूर्ण समर्पण व देवाबरोबर पुन्हा जोडणारे आहे. 
भविष्यवाणीची पूर्णत्व व देवाला समर्पण करणारी प्रार्थना: स्तोत्र ३१:५ चा संदर्भ येथे आहे, “तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो; हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस.” हा भविष्य संदेश येथे पूर्ण झाला आहे. प्रभूने आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला हे असे कृत्य आहे की ज्यातून त्याचे संपूर्ण समर्पण आपल्या लक्ष्यात येते व आपल्यालाही प्रत्यक स्थितीत देवावर संपूर्ण विश्वास टाकण्यास व प्रार्थना करण्यास मार्गदर्शन करते. बायबल सांगते,आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली; इब्री५ :७.  
बंधू स्टेफनाने देखील अशीच प्रार्थना व समर्पणाचे कृत्य आपल्याला पाहावयास मिळते.ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” प्रेषित ७:५९. प्रेषित पेत्र आपल्याला विश्वासू निर्माण कर्त्यावर पूर्ण भाव ठेवण्यास उत्तेजना देतो, तो म्हणतो, नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?” ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्‍यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत.
पित्या बरोबर पुन्हा एकत्व: येशू ख्रिस्त आपला आत्मा देवाकडे सोपोवतो. ख्रिस्ताच्या या वाक्यावरून आपल्याला कळते की, तो आपला उद्धार करण्यासाठी  स्वइच्छेने अर्पिला गेला. आणि त्याने देवाच्या हाती आपल्या आत्म्याला सोपवून पुन्हा पित्याबरोबर एकत्व प्राप्त केले. हा मोठा विजय आम्हांला ख्रिस्तामध्ये मोठी आशा देतो. 
संत पौल म्हणतो,”कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे.” फिली १: २१-२४.  ख्रितामध्ये त्याच्या सेवकांना व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना. आपल्या पृथ्वीवरील व स्वर्गातील जीवनाबद्दल स्पष्टता आहे. याबद्दल आपण अजाण असू नये.
 
आत्म्याच्या पित्याच्या अधीन राहिल्याने आपण जिवंत राहू, इब्री १२ :९ तसेच आत्म्याचा नाशही होऊ शकतो, बायबल सांगते, “मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार? मत्तय १६:२६. याचा अर्थ माणसाने आपल्या आत्म्या बद्दल जागृत असावे. शरीरा पेक्षा आत्मा मौल्यवान आहे. 
 
प्रार्थना: हे प्रभू तू स्वइच्छेने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. आम्हाला जीवन मिळावे म्हणून तू मरण पत्करले. तरी, तू आपला आत्मा पित्याच्या हाती देऊन तू तुझा अधिकार व सामर्थ्य प्रगट केले. आणि आम्हांलाही तुझ्यामध्ये उद्धाराची मोठी आशा दिली म्हणून आणि तुला धन्यवाद देतो. आम्हांलाही विजयी जीवन जगण्यास कृपा पुरव. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, अमीन. 
 
रेव्ह कैलास [अलिशा ] साठे. 
 
https://www.bible.com/bible/1686/AMO.8.9
 
http://www.scielo.org.za/scielo.php?script=sci_arttext&pid=S0259-94222015000200055

https://en.wikipedia.org/wiki/Persecution_of_Jews

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole