आत्मिक जीवनात पवित्र आत्म्याचे महत्व
प्रस्तावना: आत्मिक जीवनाच्या प्रवासात पवित्र आत्म्याचे अनन्य साधारण महत्व आहे. आत्मिक जीवनात कर्ता करविता सर्वकाही पवित्र आत्मा आहे. तारणाच्या स्वरूपात जी देवाची कृपा मनुष्यासाठी प्राप्त झाली आहे. तिला माणसाच्या जीवनात मूर्तरूप देणारा पवित्र आत्मा आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या कार्याला समजून घेणे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे, जर त्याला पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल सखोलपणे कळाले तर तो एक खरे समर्पित ख्रिस्ती जीवन जगू शकतो.
पवित्र आत्म्याद्वारे कृपेचे कार्य : विश्वासाने व देवाच्या कृपेने आपले तारण झाले आहे, इफिस २:८-९. हे आपण जाणतो परंतु हा विश्वास व कृपा आपल्या पर्यंत कशी आली ! याचे उत्तर आहे पवित्र आत्मा आहे. आपण म्हणतो मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, मी पश्चाताप केला, मी येशूला जीवन समर्पित केले, मी येशूला अनुसरण्याचा निर्णय घेतला, परंतु आपण जे आत्मिक रित्या मृत अवस्थेमध्ये होतो त्या आपल्याला हे सगळे करण्यास सहाय्य केले ते पवित्र आत्म्याने हे आपण विसरता काम नये. जॉन वेस्ली पवित्र आत्म्याच्या या कार्याला देवाची पुढाकार घेऊन कार्य करणारी कृपा [prevenient grace]/ किंवा क्षमता पुरवणारी कृपा [enabling grace] असे मानत होते.याचा अर्थ कोणीही मनुष्य सुवार्तेला तेव्हाच प्रतिसाद देतो किंवा देऊ शकतो जेंव्हा पवित्र आत्मा कृपावंत होऊन त्याला सहाय्य पुरवतो. म्हणजे पवित्र आत्मा देवाची कृपा घेऊन आपल्यापुढे सुवार्तेच्या वाटा तयार करीत आहे. प्रेषित २:३७-४१. प्रेषित १६:६-१५.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला त्याच्या तारणाची खात्री देतो : एखाद्या व्यक्तीने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन आपले जीवन त्याला समर्पित केले, तर देव त्याच्या पापांची क्षमा करून त्याची सर्वकालच्या जीवनासाठी निवड करितो. ज्याला आपण तारण असे म्हणतो. परंतु आपले खरोखर तारण झाले आहे हे त्या व्यक्तीला कसे कळते? कारण तारणामुळे त्याच्या बाह्य व्यक्तित्वात काहीच बदल झालेला नसतो. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पवित्र आत्माच आहे. वचन सांगते, “जितक्यास देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत, कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हांस मिळाला नाही, तर ज्याच्याकडून आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांस मिळाला आहे, पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्या बरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत,” रोम ८:१४-१६ पवित्र आत्मा आपल्या जीवनावर मोहरबंद शिक्का व तारणाच्या प्रतिफळाचा विसार आहे. इफिस १:१३-१४. पवित्र आत्मा आपल्याबरोबर राहतो, आपण त्याला ओळखतो तो आपल्यामध्ये असतो १करिंथ ६:१९, योहान १४:१६-१७.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यास आत्मिक जीवन जगण्यास सामर्थ्य देतो : पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेंव्हा तुम्हांला सामर्थ्य मिळेल, आणि यरुशलेमेत व सर्व यहूदीयात व शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रेषित १:८ पवित्र आत्मा आमच्या अंतर्यामीच्या मनुष्याला सामर्थ्याने बळकट करितो. इफिस ३:१६ आत्म्याचे सामर्थ्य आम्हांला सेवेसाठी चालवते. लूक ४:१४. १ तीम १:१२. पवित्र आत्मा आम्हांला निर्भय बनवतो प्रेषित २:१४. २ तिम १:७.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यास मार्गदर्शन करतो : तरी जेंव्हा तो, म्हणजे खरेपणाचा आत्मा, येईल तेंव्हा तो तुम्हांस वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल; कारण तो आपल्या आपण बोलणार नाही, तर जें काही तो ऐकेल तेच तो बोलेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. योहान १६:१३. तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवील तो पाराक्लेत, म्हणजे पवित्र आत्मा, तुम्हांस सर्व शिकवील, आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल. योहान १४:२६.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यास प्रार्थनेत सहाय्य करितो: पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला प्रार्थने मध्ये सहाय्य पुरवतो. वचन सांगते,”त्याप्रमाणे आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्यानी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि जो अंतःकरण शोधतो त्याला आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण तो पवित्र लोकांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो”. रोम ८:२६-२७.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला आध्यात्मिक कृपादाने देतो व आत्मिक फळांनी त्याचे व्यक्तित्व विकसित करितो: कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु आत्मा एकच आहे. आणि सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु प्रभू एकच आहे. आणखी कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु देव जो अवघ्यांमध्ये अवघी कार्य करतो तो एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण प्रत्येकाला उपयोगासाठी दिलेले आहे. कारण एकाला आत्म्याकडून ज्ञानाचा शब्द दिलेला आहे, व दुसऱ्याला त्याच आत्म्याप्रमाणे विद्येचे शब्द, दुसऱ्या एकाला त्याच आत्म्यात विश्वास, आणि दुसऱ्याला त्या एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, दुसऱ्याला चमत्कार करणे, आणि दुसऱ्याला भविष्य सांगणे, दुसऱ्याला आत्म्याचे भेद पाहणे, दुसऱ्या एकाला अनेक प्रकारच्या भाषा, व दुसऱ्याला भाषांचा अर्थ सांगणे; परंतु हि सर्व कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. १ करिंथ १२:४-११. दुसरे वचन आत्म्याच्या फळांबद्दल सांगते, आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याने विश्वासणाऱ्याचे व्यक्तित्व अतिशय उच्च कोटीच्या जीवनशैलीमध्ये परावर्तित होते.”आत्म्याचे फळ हे आहे: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रियदमन अशा गोष्टींविरुद्ध नियमशास्त्र नाही. गलती ५:२२-२३.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला सेवेसाठी वेगळे करितो: अत्युखिया येथील मंडळींमध्ये बर्णबा व निग्र म्हटलेला शिमोन व लूक्य कुरणेकर व ज्याचे पालन मांडलीक राजा हेरोद याच्या बरोबर झाले होते तो मनाएन व शौल भविष्यवादी व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा करीत असता, उपवास करीत असता पवित्र आत्म्याने सांगितले की, बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्या करीता निराळे करून ठेवा. प्रेषित १३:१-२.
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे.