वचन: सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोम ३:२३.

प्रस्तावना: आज आपण पृथ्वीवरील सर्व मानव दोन भागात विभागू शकतो. एक भाग तारलेल्या मानवांचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, जे पापाच्या, शापाच्या, व सैतानाच्या बंधनातून मुक्त झाले आहेत. व दुसरा भाग म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवत नसल्यामुळे जे पापाच्या शापाच्या व सैतानाच्या बंधनात आहेत.
सैतानाने मानवाची स्थिती अतिशय वाईट करून ठेवली आहे : ह्या प्रमाणे लिहिलेले आहे की, न्यायी कोणी नाही, एक देखील नाही; समजणारा कोणीही नाही, देवाचा शोध करणारा कोणीही नाही; सत्कर्म करणारा कोणीही नाही, एक देखील नाही, त्यांचा गळा उघडे थडगे आहे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे, जोगी सर्पाचे विष त्यांच्या ओठांच्या आंत आहे; त्यांचे तोंड शापाने व कडुपणाने भरलेले आहे; त्यांचे पाय रक्तपात करायला उतावळे आहेत; नाश व हाल त्यांच्या मार्गांमध्ये आहेत; आणि शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही; त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही. रोम: ३:१०-१८. मानवाची हि अवस्था आहे. संपूर्ण पृथ्वी पापाच्या अंधकारानी भरलेली आहे. यशया ८:२२, ६०:२अ.
प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने पाप क्षमा मिळते: मानवाला या पापरुपी अंधारातून सुटण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाणे अतिशय गरजेचे आहे. तोच मार्ग, सत्य, व जीवन आहे.योहान १४:६. प्रथम मानवाने आज्ञाभंगाचे पाप केले व त्याच्यावर सैतानाचे अधिपत्य, अंधाराचे राज्य व मरण आले. परंतु मानवी रूपात येशू ख्रिस्ताने जीवनाच्या शेवटच्या स्वासा पर्यंत केलेल्या आज्ञापालनामुळे, मानव न्यायी ठरला व सैतान दोषपात्र ठरला. म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो सैतानाच्या जोखडातून मुक्त होऊन सार्वकालिक जीवन मिळवतो. रोम ६:२३.
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. मी प्रकाश असा जगांत आलो आहे; यासाठीकी जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. मी जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. योहान १२:४४ -५०.
आपण आपल्या पापांची क्षमा मिळवून शापाच्या व सैतानाच्या बंधनातून कसे मुक्त व्हावे: प्रत्येक माणूस जो शापित जीवन जगत आहे, पाप ज्याच्या जीवनात राज्य करीत आहे, जो सैतानी बंधनात आहे. त्याने ख्रिताद्वारे येणाऱ्या उध्दाराच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे. बायबल सांगते,”विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणजे : तू आपल्या मनात म्हणू नको की, ऊर्ध्वलोकी कोण चढेल? (अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास ) किंवा अधोलोकी कोण उतरेल? (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास) तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे; आमच्या विश्वासाचा विषय असलेले वचन आम्ही गाजवत आहो ते हेच होय, की, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल; कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच; आणि जे त्याचा धावा करितात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो सम्पन्न आहे.कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. रोम १०:६-१३.
रेव्ह कैलास (आलिशा ) साठे.
=========================================================================