वचन: तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल, तो तुझ्या मधून रोगराई दूर करील. निर्गम २३:२५
प्रस्तावना: देवाची उपासना केल्याने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात यावर आपण सर्वच विश्वास ठेवतो. तरी अनेक जण या बाबतीत संभ्रमित असतात. त्यांच्या मनात अनेक कल्पना येतात, त्यामुळे देवाच्या उपासनेकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोण योग्य राहत नाही, व परिणामी देवाच्या उपासनेचे योग्य प्रतिफळ म्हणजे आरोग्य व बरकत त्यांच्यात दिसत नाही. पैसे कमावण्यासाठी, सुख व आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी ते जगाच्या स्पर्धेत जीवाचे रान करताना दिसतात. देवाचे वचन सांगते,’परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ जातात, देव त्याचे भय धरणाऱ्यासाठी तो झोपेत असतानाच त्याला काय हवे याची व्यवस्था करितो. स्तोत्र १२७. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने जगाच्या स्पर्धेत न पडता देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवावा, त्यातून देवाला आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे जमजून घ्यावे व त्याची उपासना आत्म्यात व खरेपणात करावी. तर आपण समजून घेऊ या की देव आपल्याला त्याची उपासना का करावयास सांगत आहे ? व उपासनेची नेमकी पद्धत काय आहे ?
१] स्वर्गीय व्यवस्था:
देव म्हणजे विश्वाचा निर्माता होय, स्वर्ग त्याचे सिहांसन व पृथ्वी त्याचे पादासन आहे. प्रेषित ७:४९–५०. अशा महान सनातन देवाची उपासना करणे हि स्वर्गीय व्यवस्था आहे. सर्व सृष्टी त्याची स्तुती, भक्ती व आराधना करते. स्तोत्र १९:१ सांगते,”आकाशें देवाचा महिमा वर्णितात आणि अंतराळ त्याच्या हाताची कृत्य दाखवते. देवाच्या सेवकांना या व्यवस्थेचे दृष्टातं रूपात दर्शन झाले आहे. यशया संदेष्ट्याने देवाला उंच स्वर्गीय सिंहासनावर बसलेले पाहिले व सराफीम त्याचे गौरव स्तुती स्तवन करीत म्हणत होते की, ‘सैन्यांचा यहोवा, पवित्र, पवित्र, पवित्र, आहे. यशया ६:१–४.
प्रेषित योहान याने सुद्धा स्वर्गीय भक्तीचा दृष्टातं पाहिला, येथे अद्भुत प्राणी देवाची स्तुती स्तवन करताना त्याला पवित्र, पवित्र, पवित्र, प्रभू जो देव, जो सर्वसत्ताधारी, जो होता आणि आहे आणि येणार, असे म्हणत असतांना रात्रंदिवस थांबत नाहीत. आणि जेव्हा जेव्हा चार प्राणी राजासनावर जो बसलेला, जो सदासर्वकाळ जिवंत आहे, त्याचे गौरव आणि सन्मान आणि उपकार स्तुति करतात, तेंव्हा तेंव्हा ते चोवीस वडील राजासनावर जो बसलेला त्याच्यापुढे उपडे पडतात, आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करतात आणि आपले मुगूट राजासनापुढे टाकून म्हणतात, हे प्रभू , गौरव आणि सन्मान, आणि सामर्थ्य घ्यायला तूं योग्य आहेस, कारण तूं सर्व काहीं अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि अस्तित्वात आणले गेले. प्रगटीकरण ४: १–११.
देवाच्या भक्तीचा पाया त्याच्या पावित्र्यावर व न्यायीपणावर आधारित आहे. हे न्यायीपण व पावित्र्य केवळ त्याचे आहे. या विश्वात कोणीच त्याच्यात आपले भागीपण दाखवू शकत नाही. म्हणून केवळ तोच स्तुतीस व भजण्यास पात्र आहे.स्तोत्र १४८ सांगते,’ सर्व दूतांनी, सैन्यांनी, सूर्य, चंद्र, तारे व आकाशांनी व आकाशांवरल्या जलांनी, इतकेच नाही तर समुद्रांतील जीवांनी, आगाध्यानीं, अग्नी गारा हिम धुके व वादळ, सर्व डोंगर, झाडे, गंधसरु, श्वापदें, गुरे, सरपटणारे जीव, उडणारे पक्षी, राजें, सर्व लोक, अधिपती, सर्व न्यायधीश, कुमार, कुमारी, म्हातारे व तरणे, हि सर्वं यहोवाला स्तवोत कारण त्याचे नाव मात्र उंचावले आहे त्याचे ऐश्वर्य पृथ्वी व आकाशें यांच्यावर आहे. स्तोत्र ९६ :६ सांगते,”महिमा व प्रताप त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व शोभा त्याच्या पवित्रस्थानांत आहेत.
२] देवाच्या या स्वर्गीय वैभवाशी सैतान स्पर्धा करितो: सैतानाला गर्व झाल्यामुळे त्याचे पतन झाले. बायबल सांगते, “अरे दीप्तिमंता, प्रभातेच्या मुला, तूं आकाशांतून कसा पडलास ! अरे राष्ट्रांस निर्बल करणाऱ्या, तूं कसा छेदला जाऊन धुळीत टाकलेला आहेस? कारण तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेल, देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिहांसन उंचावीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतांवर बसेन; मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेन, मी आपणास परात्परासारखा करीन. तथापि तूं मृत्यूलोकांत खोल खाचेच्या अगदी शेवटल्या भागात आणून टाकला जाशील. यशया १४:१२–१५. या वचनांवरून स्पष्ट होते की सैतान देवाच्या गौरवाशी स्पर्धा करतो. त्याची इच्छा आहे की देवाच्या सदृश रूपात निर्माण केलेल्या मानवाने त्याची भक्ती करावी. म्हणून पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपात सैतान व त्याच्या बरोबरचे पतित देव दूत, ज्यांना आपण दुरात्मे किंवा भूतेही म्हणतो, हे माणसांना वेगवेळ्या मोहात पाडून भुलवतात व त्यांच्या भक्तीस प्रवृत्त करितात. रोमकरांस पत्र १: २१ सांगते,’ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही व त्याची उपकारस्तुतिही केली नाही; परंतु ते आपल्या तर्क वितर्कांनीं निरर्थक झाले, आणि त्यांचे मूढ अंतःकरण अंधाराने भरून गेले. आपण ज्ञानी असे ते म्हणवीत असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून त्याच्या बदली नाशवंत मनुष्याच्या व पक्षांच्या व चतुष्पादांच्या व सर्पटणाऱ्यांच्या आकाराची मूर्ती करून घेतली. हे सर्व सैतानामुळे झाले कारण तो मानवाला भुलवून देवाच्या ऐवजी त्याची व दुरात्म्यांची भक्ती करून घेतो. त्याला देवाचे गौरव, स्तुती आराधना आवडत नाही. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा मोहात पाडण्याचा प्रयत्न करून स्वतःला नमन करण्यास सांगितले. मत्तय ४: ८–९.
देव ईर्ष्यावान आहे : देव त्याच्या गौरवाच्या बाबतीत इर्ष्यावान आहे. देवाचे वचन सांगते,”मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे ; आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही , व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. यशया ४२:८. पुढे देवाचे वचन सांगते,’ पृथ्वीवरील सर्व लोक; यहोवाला नवे गीत गा, त्याची प्रशंसा करा, त्याला गौरव द्या, यशया ४२: १०–१२. जे मूर्तीवर भाव ठेवतात ते लाजवले जातील. कारण हे देवाला ओंगळ वाटणारे कर्म आहे देव याचा द्वेष करितो, त्यांनी मूर्तीपुढे आपल्या कन्या व पुत्र अग्नीत जाळल्या. अनुवाद १२:२९–३१.
देवाची उपासना कशी करावी: देवाची उपासना केल्याने अन्न पाण्यास आशीर्वाद प्राप्त होतो व रोगराई दूर होते. हे उत्तम आशीर्वादाचे अभिवचन देवाची उपासना करण्यावर अवलंबून आहे. बायबल सांगते,’जसा तो पवित्र आहे तसे त्याच्या लोकांनी पवित्र असावे,’ लेवीय ११:४४. हि उपासना पवित्र्याने युक्त होऊन असावी. जसा तो पवित्र आहे तसे त्याच्या उपासकाने सुद्धा पवित्र असावे.
स्तोत्रकर्ता म्हणतो,”परमेश्वराच्या गिरवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ व आणि मन शुध्द आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावीत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो, त्याला परमेश्वरा पासून आशीर्वाद मिळेल. स्तोत्र ९६:९. मनुष्य आशीर्वादासाठी खूप काही करू इच्छितो. जसे होमबली, असंख्य अर्पणे परंतु देव म्हणतो नीतीने वागणे, आवडीने दया करणे, व माझ्या संगती राहून नम्र भावाने चालणे एवढेच मी माझ्या उपासकांकडून मागतो. मिखा ६:६–८. देव पवित्र व न्यायी आहे, त्याच्या लोकांकडून तो न्यायी व पवित्र जीवनाची अपेक्षा करितो. देवाचे वचन सांगते, “जो परका तुमच्या जवळ उपरी म्हणून राहतो, तो तुमच्यामध्ये देशात जन्मलेलेल्यासारखाच तुम्हांला असावा, आणि जशी तू आपणावर तशी तूं त्याच्यावर प्रीती कर ; कारण तुम्ही मिसर देशात उपरी होता मी यहोवा तुमचा देव आहे.न्याय करण्यात, लांबी रुंदी मोजण्यात, वजन तोलण्यात व परिणाम मापण्यात तुम्ही अन्यायीपण करू नका, खरे तराजू , खरी वजने, खरे एफा माप, व खरे हीन माप, अशी खरी मापे तुम्हांला असावी; ज्याने मिसर देशातून तुम्हांला बाहेर आणिले तो मी यहोवा तुमचा देव आहे. आणि तुम्ही माझे सर्व नियम व माझे सर्व विधि पाळा, आणि ते आचरा; मी यहोवा आहे.” लेवीय १९: ३४
माणसासाठी देवाचे न्यायीपण व पवित्रता आचरणे अशक्य आहे देवाच्या उपासनेसाठी तो मिखा संदेष्टयाच्या म्हणण्या प्रमाणे सर्व काही अर्पण करीन परंतु देवाची पवित्रता व न्यायीपण कोठून आणील कारण ते फक्त देवापाशी आहे. असे जर आपले म्हणणे असेल तर आपल्यासाठी प्रभू येशू सांगतो की, हि अशी वेळ आहे की आता त्याचे खरे भक्त आत्म्यात व खरेपणात त्याची उपासना करतील. व देवाच्या अगणित आशीर्वादांचे भागी होतील.
योहान ४:२४.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू तुझे न्यायीपण, ज्ञान, नीतिमत्व, व पावित्र्य माझ्यावर स्थापित केले आहे, म्हणून मी तुझे आभार मानतो. मला आत्म्यात व खरेपणात उपासना करण्यास सहाय्य कर, मला यश, बरकत व आरोग्य लाभुदे. येशूच्या नावाने मागतो, आमेन.
रेव्ह.कैलास [अलिशा]साठे .