बायबल स्टडी [ अध्यात्मिक जीवन ]
ख्रिस्ती आत्मिक जीवनाचा पाया
प्रस्तावना: ख्रिस्ती जीवन म्हणजे “आत्मिक जीवन” असे आपण म्हणू शकतो. कारण ख्रिस्ती व्यक्तीने आत्मिक असणे आवश्यक आहे, किंवा आपण असेही म्हणू शकतो की ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे आत्मिक व्यक्ती, जर कोणी ख्रिस्ती व्यक्ती, “आत्मिक” नाही तर तो ख्रिस्ती नाही. आणि हि अतिशोव्यक्ति नाही तर सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त निकदेमला मार्गदर्शन करताना सांगतो,“मी तुला खचित खचित सांगतो पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पहाण्यास समर्थ नाही, जे देहापासून जन्मलेले ते देह आहे, आणि जे आत्म्या पासून जन्मलेले ते आत्मा आहे.” योहान ३:५-६ ह्या सत्याला जर कोणी समजून घेत नाही तर तो कधीही एक आशीर्वादित [ यशस्वी ] ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. म्हणून आत्मिक जीवन म्हणजे काय? काय केल्याने ते आपण योग्य प्रकारे जगू शकतो ? आत्मिक जीवन जगताना कोणत्या अडचणी येतात? हे आपल्याला समजेने अतिशय आवश्यक आहे. हे जर आपल्याला समजले तर आपण आपल्या आत्मिक जीवनाचा पाया योग्यप्रकारे घालू शकू.
आपला आत्मिक जीवनाकडे पाहण्याचा एक योग्य आत्मिक दृष्टीकोण असला पाहिजे. तो आत्मिक दृष्टीकोण पवित्र शास्त्राच्या सखोल आभ्यासातून आपल्याला प्राप्त होतो; व या “प्रगल्भ दृष्टीकोनाला” आपण आत्मिक जीवनाचा पाया म्हणू शकतो.मग त्यावर जी आत्मिक इमारत उभी राहील ती अतिशय गौरवी असेल. .चला तर मग जाणून घेऊ या की ‘ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनाच्या पायाभूत गोष्टी कोणत्या आहेत’?
अ ] आत्मिक जीवन म्हणजे काय ? ख्रिस्ती आत्मिक जीवनाच्या पायाभूत गोष्टींमध्ये प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे की.’आत्मिक जीवन म्हणजे काय ? जो पर्यंत आपण हे जाणून घेत नाही की आत्मिक जीवन म्हणजे नेमके काय आहे, तो पर्यंत आपल्या आत्मिक जीवनाची गाडी रुळावर येत नाही.
आत्मिक जीवनाबद्दल जाणून घेताना आपण समजून घेतले पाहिजे की, ख्रिस्ती आत्मिक जीवन हे एका आत्मिक प्रक्रियेतून जात असते. हि आत्मिक प्रक्रिया म्हणजेच आत्मिक जीवन असे आपण म्हणू शकतो. हि आत्मिक प्रक्रिया देवाच्या योजनेचा भाग असते.पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात व अधिकारात जीवन जगून, देवाबरोबरच्या आपल्या संबंधात व आत्मिक अनुभवात वाढत जात, ख्रिस्ती आत्मिक जीवनाची परिपक्वता गाठणे व त्यात स्थिर राहणे हे ख्रिस्ती आत्मिक जीवन आहे. अर्थात या गोष्टी फक्त आत्मिक व्यक्तीलाच कळू शकतात, दैहिकाला नाही.
वचन सांगते, आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या त्या आम्ही जाणाव्या. त्याच गोष्टी आम्ही सांगतो; मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दानी आम्ही त्या सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दानी आत्मिक गोष्टींची तुलना करून सांगतो. परंतु जीवस्वभावाचे माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी अंगिकारित नाही, कारण त्याला त्या मूर्खपण अशा वाटणाऱ्या आहेत, आणि त्याच्याने त्या जाणवत नाहीत, कारण त्या आत्म्याच्या योगे समजण्याच्या आहेत. परंतु आत्मिक आहे तो सर्व गोष्टी समजतो, तथापि तो स्वतः कोणाकडूनही समजण्यात येत नाही; कारण प्रभूचे मन असे कोणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे ? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. १ करिंथ २:१२-१६.
ब ] आत्मिक परिपक्वता म्हणजे काय ? ख्रिस्ती आत्मिक जीवनाचे “सत्व” आत्मिक परिपक्वता आहे. हि आत्मिक परिपक्वता प्राप्त झाल्याने, आपला देवाकडे पाहण्याचा, जगाकडे पाहण्याचा, आपल्या जीवनाकडे पाहण्याचा व मंडळीकडे [चर्चकडे ] पाहण्याचा दृष्टीकोण योग्य होतो.त्यामुळे दैहिक जीवन व आत्मिक जीवन यातील फरक आपल्याला स्पष्टपणे समजू लागतो, व आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला अधिक महत्व देतो व स्वतःचे जीवन त्याच्या इच्छेनुसार जगण्याससमर्पित करून, रोज त्याच्याकडे आपल्या आत्मिक जीवनाच्या प्रवासासाठी कृपा मागतो. यामुळे आपण त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास समर्थ होत जातो व शेवटी ख्रिस्त सदृश स्वभाव आमच्या कृतीतून दिसू लागतो. हे आत्मिक जीवनाविषयीचे अलौकिक सत्य आहे. हे प्रार्थना व ख्रिस्ती सह्भागीतेच्या द्वारे प्राप्त होते. संत पौल कलस्सेकरांस मार्गदर्शन करताना म्हणतो, “मी तुम्हांसाठी प्रार्थना करण्यात अंतर करीत नाही, आणि असे मागतो की, सर्व ज्ञान व आत्मिक समज यात तुम्ही त्याच्या इच्छेच्या पूर्ण ज्ञानाने भरलेले व्हावे,यासाठीकी तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता प्रत्येक चांगल्या कामात फळ देत आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने वाढत, त्याला योग्य असे चालावे, आणि सर्व सहनशीलता व आनंदयुक्त धीर तुम्हांला प्राप्त व्हावा म्हणून त्याच्या गौरवी बलाप्रमाणे तुम्ही सर्व सामर्थ्याने समर्थ व्हावे, आणि ज्याने तुम्हांला उजेडातील पवित्रांच्या वतनाचे विभागी होण्यास योग्य केले त्या बापाची तुम्ही उपकार स्तुती करावी.” कल १:९ब-१२. म्हणून आत्मिक जीवन जगताना आत्मिक परिपक्वता लाभावी हीच आमची तहान भूक असावी.
तर प्रियांनो, आपल्या आत्मिक जीवनाचा पाया घालताना, “आत्मिक जीवन म्हणजे काय”? व “आत्मिक परिपक्वता म्हणजे काय”? या दोन गोष्टी प्रथम समजून घ्यायला पाहिजेत. माझा विश्वास आहे की तुम्ही हा बायबल स्टडी पूर्ण करताना या दोन्ही गोष्टी समजून घ्याल, परिपक्व व्हाल,आशीर्वादित व्हाल.
प्रार्थना हे प्रभू येशू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्मिक जीवन म्हणजे काय आहे? आत्मिक परिपक्वता काय आहे ? हे कळू दे. त्यांच्या आत्मिक जीवनाचा प्रवास तुझ्या हाती घे . व त्यांना आनंददायी, आशीर्वादित असे ख्रिस्ती जीवन लाभुदे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.
👇
आत्मिक प्रवासातील अडखळणे: आपल्या आत्मिक जीवनाचा पाया घालताना,आपल्याला या प्रवासातील अडखळणे समजली पाहिजेत. आपण या जगात जीवन जगत असताना, अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतो. जसे वेगवेळ्या प्रकारचे लोक व त्यांची जीवनशैली. वेगवेळ्या प्रकारचे आध्यात्मिक व जगिक शिक्षण. वेगवेगळे धर्म संस्कृतींचे प्रभाव, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सैतानाने हस्तक्षेप करून प्रभावीत केल्या आहेत त्या आपल्या आत्मिक प्रवासामध्ये आव्हाने उभे करतात. म्हणून जगाकडे व जगातील शिक्षणांकडे पाहण्याचा आपला योग्य दृष्टीकोण असला पाहिजे. हा योग्य दृष्टीकोन आपल्याला आत्मिक परिपक्वतेमध्ये जीवन जगण्यास सहाय्यभूत होतो. परंतु या सर्वांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सदोष असेल तर ह्या गोष्टी आत्मिक जीवनासाठी अडखळण ठरतात. चला तर मग आपण जग व जगातील लोकांना योग्य प्रकारे समजून घेऊ.
यासाठी आपल्याला जगाला व जगातील लोकांनां वेगवेगळ्या भागात विभागावे लागेल… 🗺
सम्पूर्ण जग : प्रथम आपण संपूर्ण जगाला एकत्र पाहू . येथे आपण जगातील सर्व लोकांना पाहू शकतो ! त्यांना वेगवेळ्या भागात विभागून सुध्दा पाहू शकतो.तुम्ही त्यांना ख्रिस्ती, मुस्लिम, बौद्ध, हिंदू असे वेगवेगळ्या धर्मात विभागून पाहू शकता. येथे तुम्ही त्यांची विभागणी आस्तिक व नास्तिक अशीही करू शकता. तुम्ही त्यांना जातीत विभागू शकता, त्यांना वर्णात विभागू शकता, वर्गात विभागू शकता, लिंगात विभागू शकता, असे असंख्ये दृष्टीकोण तुमच्याकडे असतील की ज्याद्वारे तुम्ही जगाकडे पाहत असताल.
परंतु, या सर्व दृष्टीकोनांना बाजूला ठेऊन, आपण पवित्र शास्त्रीय दृष्टीकोन स्वीकारून,आपल्या आत्मिक प्रवासात अडखळण येऊ नये म्हणून आपण या जगाला पुढील चार भागांमध्ये विभागून पाहिले पाहिजे!
१] उध्दार न पावलेले लोक: उध्दार न पावलेले लोक म्हणजे जे येशू ख्रिस्ताला विश्वासाने अनुसरत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत असे, व ज्यांना येशूबद्दल माहित नाही असे, म्हणजे ज्यांच्या पर्यंत सुवार्ता गेली आहे पण ते सुवार्तेला स्वीकारत नाहीत, किंवा त्यांना सुवार्ता समजली नाही व काही असे आहेत की ज्यांच्याकडे सुवार्ता गेली नाही ; त्यामुळे ते विश्वास ठेऊ शकत नाहीत. हे सर्व लोक उध्दार न पावलेले आहेत हे येथे आपण समजून घेणे आवश्यक आहे.येथे उध्दार न पावलेल्यांच्या बद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात.जसे, ते सुवार्तेवर का विश्वास ठेऊ शकत नाहीत? ज्यांना सुवार्ता कळालीच नाही किंवा ज्यांच्या पर्यंत सुवार्ता गेलीच नाही त्यांचे काय? परंतु येथे हे सत्य लक्षात घ्या कि, प्रभू येशू म्हणतो, धनवानाला देवाच्या राज्यात जाणे या पेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आणि शिष्यानी हे ऐकले तेव्हा फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणार. मग येशूने त्यांच्याकडे पाहून म्हटले, माणसांना अशक्य आहे, परंतु देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. मत्तय १९:२४-२५, उद्धाराचे कार्य संपूर्णतः देवाच्या कृपेचे कार्य आहे त्यांना कृपेने आकर्षिले त्यांनी आनंद मानावा, व जे अद्याप कृपेपासून दूर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थनेत असावे.
२] तारण पावलेले लोक : तारण म्हणजे मानवी जीवनाच्या उद्धारासाठी निरंतर चालू असलेले देवाचे कार्य. तारणासाठी विश्वास हा एकच मापदंड देवाने ठेवला आहे. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आपण वाचतो कि पौल व सीलास ह्यांना त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जेंव्हा विचारले की “महाराज माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे? तेव्हा ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रेषित १६:३१ तारण हे केवळ देवाच्या कृपेने होते, येथे सर्वकाही देव आहे, त्याची कृपा आहे. आत्मिक दृष्ट्या मृत मानवाला जागृत करणे हे कामही देवाची कृपा करते. जो जागृत झाला त्याला विश्वास ठेवण्यापर्यंत वाढवण्याचे कामही देवाची कृपाच करत असते. ज्याने विश्वास ठेवला त्याच्या पापांची क्षमा करून त्याला नीतिमान ठरवणे हेही देवाच्या कृपेचे काम आहे, व पाप क्षमा मिळवून नीतिमान ठरलेल्या व्यक्तीला पवित्रीकरणाच्या प्रक्रियेतून घेऊन जाणारी सुध्दा देवाची कृपाच आहे.जे या सगळ्या कृपांना वेगवेगळ्या स्तरांवर नम्र पणे मान देतात व देवाच्या हाती समर्पित राहतात ते तारण पावतात.
३] तारण पावलेले परंतु अपरिपक्व ख्रिस्ती : देवाची कृपा मानवाला आत्मिक दृष्ट्या मेलेल्या स्थितीतून जागृत करते, त्याला विश्वास ठेवण्यापर्यंत सहाय्य करते, त्याने विश्वास ठेवल्या नंतर त्याच्या पापांची क्षमा करून त्याला देवाकडून कृपेनेच नीतिमान ठरवले जाते. येथून पुढे त्याच्या आत्मिक जीवनाचा प्रवास सुरु होतो. हा प्रवास अपरिपक्वते कडून परिपक्वते कडे जाणारा असतो. यातही देवाची कृपाच कार्यरत असते.
या आत्मिक जीवन प्रवासाला वेगवेगळी नावे आहेत. जसे पवित्रीकरण, आत्म्याने भरलेले जीवन, विश्वासाचे जीवन, विजयी ख्रिस्ती जीवन, ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी. वधस्तंभावर खिळलेले जीवन, विपुल जीवन, फलद्रुप जीवन अशी अनेक नावे आपल्याला माहित असतील, सर्वांचा मतितार्थ एकच आहे, की आपण “आत्मिक” परिपूर्ण व्हावे. इफिसकराच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात संत पौल तेथील विश्वासणाऱ्यांचे आत्मिक बळ वाढावे म्हणून प्रार्थना करताना म्हणतो, “मी अशी विनंती करितो की, त्याने आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणे तुम्हांस कृपादान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याकडून अंतर्यामीच्या मनुष्यात सामर्थ्याने बळकट व्हावे. विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने तुमच्या हृदयांमध्ये वस्ती करावी, यासाठीकी तुम्ही प्रीती मध्ये मुळावलेले व पाया घातलेले असून. ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, व लांबी, व खोली, व उंची हे सर्व तुम्ही पवित्रांच्या बरोबर समजून घ्यायला आणि ख्रिस्ताची प्रीती, जी जाणण्याच्या पलीकडे आहे ती जाणायला शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत परिपूर्ण व्हावे”. इफिस ३:१६:१९. पुढे तो करिंथ येथील मंडळीला मार्गदर्शन करताना म्हणतो, “भावांनो बुद्धी विषयी लेकरे होऊ नका, तर दुष्टई विषयी तान्ही बाळे व्हा आणि बुध्दी विषयी प्रौढ व्हा. १ करिंथ १४:२०. पुढे वचन सांगते, “जे तुम्ही इतक्या काळात शिकवणारे असायला पाहिजे होता. त्या तुम्हांस कोणीतरी देवाच्या वचनाची मूळ प्रकरणे पुन्हा शिकवावी, याची गरज आहे आणि ज्यांना दुधाचीच गरज आहे जड अन्नाची नाही, असे तुम्ही झाला आहा.” इब्री ५:१२, याकोब १:२२ सांगते,”वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे व स्वतःस भुलवणारे असे असू नका”या वचनांवरून आपण समजू शकतो की,” जे प्रभू येशुवरील विश्वासामुळे तारलेले आहेत पण ख्रिस्ताच्या प्रीतीला व कृपेला योग्य प्रतिसाद देण्यास ते कमी पडतात, किंवा ख्रिस्तीजीवनाला समजून घेण्याच्या प्रक्रियेतून जात आहेत, ज्यांना ज्ञानात सामर्थ्यात वाढण्याची गरज आहे, समर्पणात वाढण्याची गरज आहे, ते तारण पावलेले परंतु अपरिपक्व ख्रिस्ती आहेत.
४] तारण पावलेले पौढ आत्मिक ख्रिस्ती : आत्मिकरित्या प्रौढ ख्रिस्ती नेहमी स्वतःची व इतरांचीआत्मिक उन्नती करीत राहतो. हा आत्मिक प्रवास,आत्मिक ज्ञानात, सामर्थ्यात, व दैवी स्वभावात तो परावर्तित होत जातो. आत्मिक फळ त्यांच्या जीवनात दिसतात,” जसे प्रीती,आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता इंद्रियदमन, गल ५ :२२-२३.
सारांश : जेव्हा आपण जगाकडे व मंडळीकडे पहातांना योग्य दृष्टीकोनातून पाहू तेंव्हा त्यांच्यातील नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या आत्मिक जीवनावर पडणार नाही.
पुढे भाग २ पहा ...🠞🠞🠞
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे .