तत्वनिष्ठ जीवन
वचन: यहोवाने जे त्याला आज्ञापिले त्या सर्वांप्रमाणे नोहाने केले. उत्पत्ती ७:५
आपण पहातो कि नोहाच्या काळात दुष्टता अगदी शिगेला पोहचली होती. त्यामुळे परमेश्वराला मनुष्य निर्माण केल्याचा खेद झाला. त्याने संपूर्ण जीवसृष्टी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. परंतु देव न्यायी आहे तो नीतिमानाला अनीतिमाना बरोबर शिक्षा करीत नाही. नोहा देवाबरोर चालणारा होता. देवाने त्याच्यावर कृपादृष्टी केली. नोहाला तो म्हणतो तूच या पिढीत माझ्यापुढे न्यायी आहेस.
माणसे एकमेकांचे अनुकरण करतात. एकमेकांपासून प्रेरणा घेतात. जर कोणी न्यायाच्या दोन गोष्टी बोलू लागले तर आजकाल कोण असे वागतो असा प्रति प्रश्न विचारला जातो. याचा अर्थ असा असतो कि आपण जगाबरोबर चालावे. पण देवाचे वचन सांगते जगाशी मैत्री देवाशी वैर आहे, याकोब ४:४
.येथे नोहाचे जीवन पहा अवघे जग एका मार्गाने चालत होते. पण एकटा नोहा देवाच्या मार्गाने चालत होता, उत्पत्ती ६:९. पृथ्वीवर मनुष्याची दुष्टlई फार वाढल्यामुळे त्याने पृथवरील जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. तरी नोहावर त्याची कृपादृष्टी झाली कारण नोहाने जगाचा नाही तर देवाचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे देवाने नोहाला
सांगितले कि मी पृथ्वीवरील सर्व जीवांचा नाश जलप्रलयाने करणार आहे, तरी तू गोफेर लाकडाचा तारू कर. हि सूचना देवाकडून त्याला मिळाली तेव्हा तो ४८० वर्षांचा होता. देवाचे वचन सांगते की ,” विश्वासाने नोहाने, ज्या गोष्टी अजून पर्यंत कोणी पहिल्या नव्हत्या त्या विषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर, भय धरून, आपल्या घराण्याच्या तारणासाठी तारू तयार केले,
इब्री ११:७. हे काम पूर्ण करण्यासाठी त्याला १२० वर्षे लागली. हे काम करीत असताना त्याने नीतिमत्वाचा उपदेश दिला, परंतु त्याचे कोणी ऐकले नाही २ पेत्र २:५. जगाची हि रीतच आहे, हे जग दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवते, आत्मिक गोष्टींवर नाही, व आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते पाहून आपले मार्ग निवडतात. पण विश्वासणारे देवाला संतोषविण्यासाठी झटतात. नोहा १२० वर्षे कुठलीही शंका मनात न घेता काम करीत राहिला. त्याने जगाला पाहिले नाही तर देवावर विश्वास ठेऊन आपला मार्ग निवडला.
देवाने त्याच्यासाठी त्याचे कुटुंब व पशु पक्षी प्राणीमात्रातील दोन दोन जोड्या वाचवल्या. आज एकट्या नोहा मुळे आपण व जीव सृष्टी
आहे. देवाचे वचन सांगते, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण ईच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊद्या. रोम १२:२.
प्रार्थना: हे प्रभू येशू हे जग नाशाकडे जात आहे. हे तू मला कळू दिले म्हणून मी तुझे आभार मानतो. नोहा प्रमाणे तुझ्याबरोबर चालण्यास मी माझे समर्पण करितो.मी अनेकांनासाठी तारणाचे कारण व्हावे म्हणून माझे सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.