शास्त्र भाग: “तेंव्हा पहा, एक कुष्टरोगी त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, हे प्रभू , तुझी इच्छा असली तर तू मला शुध्द करायला समर्थ आहेस. तेंव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो; आणि लागलाच त्याचा कुष्टरोग जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पाहा , कोणाला सांगू नको, तर जा, आपणास याजकाला दाखीव; व त्यांना साक्ष व्हावी म्हणून मोशेने जे दान द्यायला सांगितले ते अर्पण कर,” मत्तय ८: २-४.
प्रस्तावना : आजच्या संदेशाचा प्रमुख विषय आहे, “प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आरोग्य कसे मिळते. या शास्त्र भागात आपण तीन गोष्टी प्रामुख्याने पाहणार आहोत. १) भग्न हृदय, २) विश्वास, आणि ३) साक्षीचे दान.
भग्न हृदय : बायबल माणसाच्या हृदयाबद्दल सांगते की स्वाभाविकतः माणसाचे हृदय कपटी, अतिशय नासके व खोल म्हणजे न कळणारे असते, यिर्मया १७:९. मार्क ७:२१-२३ सांगते,”कारण आतून, म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात, जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टई, कपट, कामातुरपणा, दुष्ट दृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा, या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला विटाळीतात”. जोपर्यंत माणसे आपल्या हृदयाच्या गोष्टींची आवड धरतात तो पर्यंत ते देवाकडे वळत नाहीत, अथवा देवाला व त्याच्या अस्तित्वाला मानीत नाहीत.
देवालाही अशी माणसे आवडत नाहीत. बायबल सांगते, ‘देव गर्वीष्टiना विरोध करितो व नम्र जनांस कृपा देतो’. याकोब ४:६. त्याला कुटीलांचा वीट आहे, दुष्टiच्या घरावर त्याचा शाप राहतो, निंदकांचा तो उपहास करितो. नीती ३:३२-३४. म्हणून आपल्या हृदयाच्या तालावर नाचणारी माणसे, देवाकडे वळत नाहीत. देव आणि त्यांचा छत्तीसचा आकडा असतो. अशी माणसे देवाकडे आली तर ते स्वार्थी वृत्तीने अथवा अयोग्य दृष्टीने येतात. पण त्यांना काही लाभ होत नाही. कारण देव अंतःकरण पाहणारा आहे. स्तोत्र ४४:२१.
येथे हा कुष्टरोगी तुटलेल्या हृदयाचा आहे. भग्न अवस्थेत तो प्रभू येशूकडे आला आहे. हात पसरून; पाया पडून तो ख्रिस्ताला आरोग्याची याचना करीत आहे. त्यामुळे तो कृपा पात्र ठरला. बायबल सांगते देव भग्न हृदय तुच्छ मानीत नाही तर त्यांना तो तारतो. स्तोत्र ३४:१८. ५१:१७, यशया ५७:१५.
विश्वास: ह्या कुष्टरोग्याचा विश्वास पाहता, आपल्या असे लक्षात येईल की; हि सुद्धा देवाची खूप मोठी कृपा आहे. कारण मुख्यतः अशा प्रकारचे रोगी जीवनाला कंटाळलेले असतात. त्यांना कोणतीच अशा नसते. येथे दोन हजार वर्षांपूर्वीची परिस्थिती लक्षात आणा. त्यावेळी हा रोग म्हणजे दैवी शाप व पापाची शिक्षा समजला जाई. चार हजार वर्षांपूर्वीचे ह्या रोगाचे अस्तित्व असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. यावरून लक्षात येईल की, या रोगाकडे पाहण्याचा समाजाचा काय दृष्टीकोण असेल, व प्रत्येक्ष रोगी कोणत्या प्रकारचे जीवन जगत असेल. १९४० नंतर या रोगावर उपचार करण्यासाठी परिणामकारक औषधे शोधण्यात यश मिळाले. १९६० पर्यंत या रोग्यांना समाजापासून दूर ठेवण्यात येत होते. मग, दोन हजार वर्षांपूर्वी ह्या प्रभू येशूला भेटलेल्या रोग्याची परिस्थिती काय असेल; याचा विचारच भयंकर आहे.
हा रोगी म्हणजे देवाने टाकलेला, समाजाने टाकलेला, कुटुंबाने टाकलेला व समाज मान्यते नुसार त्याच्या स्वतःच्या दृष्टीतही शापित असा असे. अशा स्थितीत देवाकडे जाणे हे केवळ देवाच्या पुढे जाऊन काम करणाऱ्या कृपेनेच शक्य आहे. ह्या कृपेचा स्वीकार केवळ नम्र, लिन, न्यायप्रिय, शांतीप्रिय व भाराक्रांत व ओझ्याने लादलेले हृदयच ह्या कृपेचा स्वीकार योग्य पणे करते. हि कृपा या कुष्टरोग्यावर झाली. त्याच्या अंतःकरणात देवाच्या कृपेने येशू ख्रिस्ताला शरण जाण्याची प्रेरणा निर्माण झाली. त्या प्रेरणेला त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला व विश्वासाने त्याने ख्रिस्ताला विनंती केली की, ‘तुझी इच्छा असल्यास तू मला शुद्ध करू शकतो’. देव विश्वासाने संतोष पावतो, ख्रिस्ताने त्याच्या विश्वासाला आनंदाने होकार देत त्याला म्हटले माझी इच्छा आहे तू शद्ध हो, व लागलाच हा महारोगी शुद्ध झाला.
साक्षीचे दानार्पण : या महारोग्याला अरोग्य मिळाल्या नंतर येशू ख्रिस्ताने जे करावयास सांगितले त्या गोष्टीला फार महत्व आहे. त्याने म्हटले कोणाला सांगू नको पण स्वतःला याजकाला दाखिव व त्यांना साक्ष व्हावी म्हणून मोशेच्या नियमाप्रमाणे दणार्पण कर. याला आपण साक्षीचे दान म्हणू.
हि साक्ष त्या याजकांना काय सांगू इच्छित असेल याचा विचार करा. त्या वेळेस अशी मान्यता होती कि कुष्टरोग म्हणजे देवाचा क्रोध किंवा शाप. हा कुष्टरोगी मोशेने लावून दिलेले अर्पण करून हीच साक्ष देणार होता की, मानवाला शाप मुक्त, पापमुक्त करणारा मसीहा आला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. हि साक्ष अतिशय महत्वाची आहे.
आम्ही जेंव्हा प्रभू येशूच्या कृपेचा अनुभव घेतो, अरोग्य मिळवतो, शाप मुक्त, पापमुक्त होतो तेंव्हा आम्हीही आमच्या आत्मिक अनुभवाची साक्ष या जगाला दिली पाहिजे. आमच्या आत्मिक परिपक्वतेतून जगाला तारणारा ख्रिस्त दिसला पाहिजे .
रेव्ह कैलास (आलिशा ) साठे.