
म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. २ करिंथ ४ :१६.
संदर्भ : हे पत्र पौलाने करिंथ येथील मंडळीला लिहिले आहे. करिंथ हे शहर पुरातन ग्रीस मधील समृध्द व अनैतिकतेने भरलेले शहर होते . पौल आपल्या मिशनरी कार्यासाठी प्रवास करत असताना, दुसऱ्या सुवार्ता फेरीमध्ये त्याने हि मंडळी या शहरात स्थापिली होती. हि मंडळी मिश्र मंडळी होती. म्हणजे या मंडळीत वेगवेगळ्या स्तरातील, बहुभाषिक व बहुवांशिक लोक होते . तसेच हि मंडळी आंतरिक व बाहेरील अशा दोन्ही आव्हानांनी त्रस्त होती. हि आव्हाने मंडळींच्या विश्वासावर नकारात्मक परिणाम करणारी होती. परंतु, दुसरीकडे, अशा स्थितीत पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे परिवर्तन करीत होता व त्यांच्या आंतरिक जीवनाला आत्मिक दिशा देत होता. संत पौल हे आत्मिक सत्य जाणून, संकटातून व कष्टाच्या परिस्थितीतून जात असलेल्या मंडळीला धैर्य व गौरवी आशा देण्यासाठी हे लिहीत आहे.
दुसरीकडे संत पौल आणि त्याचे सेवेतील सहकारीही सततच्या या आत्मिक संघर्षातून जात असताना निराश व हताश होण्यासारख्या परिस्थितीचा सामना करीत होते. त्यांनाही सुवार्तेच्या सामर्थ्यावर व पवित्र आत्म्याच्या परिवर्तनकारी कृपेवर विश्वास ठेऊन पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन याठिकाणी आपल्याला पाहावयाला मिळत आहे.
सेवाकार्य करताना येणारे आव्हाने हि आम्हांला थकवणारी आहेत. अनेक सेवक “ब्रन्ट आऊट” म्हणजे, काम व ताणतणाव यामुळे शारीरिक व मानसिक रित्या थकलेले आपण पाहतो .
परंतु, संत पौल म्हणतो, “म्हणून आम्ही थकत नाही, जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे”. हे काय रहस्य आहे ?
म्हणून या शब्दाने या वचनाची सुरुवात झालेली आपण पाहतो, हा शब्द न थकण्याच्या कारणांकडे आपले लक्ष वेधितो. व काही व्यवहारीक सत्य आपल्या समोर प्रगट करितो. हे समजण्यासाठी आपल्याला अध्याय ४ : १ चा संदर्भ समजून घ्यावा लागेल. संत पौल म्हणतो, आम्हांवर दया झाली आहे व शुभवर्तमानाची सेवा आम्हांस मिळाली आहे म्हणून आम्ही थकत नाही, २ करिंथ ४ :१. यावरून आपल्या लक्ष्यात येते की शुभवर्तमानाची सेवा हि संत पौलाला देवाने त्याच्यावर केलेली कृपा आहे असे प्रकर्षाने वाटते. त्याच प्रमाणे हि सेवा देवाचे महान सामर्थ्य प्रगट करते याची त्याला खात्री आहे म्हणून तो थकत नाही.
आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे असे संत पौल सांगत असताना तो आपल्या नाशवंत शरीराबद्दल बद्दल बोलत आहे हे आपण याठिकाणी लक्षात घ्यावे. या शरीराला तो मातीचे भांडे असे संबोधित आहे, वचन ७ . ख्रिस्ताच्या ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. त्यामुळे आम्ही थकत नाही, पण हे शरीर मातीच्या भांड्या प्रमाणे आहे, ते क्षय पावत आहे. सेवेतील आव्हाने, पेलवतांना शरीराचा ऱ्हास होतो. म्हणून तो म्हणतो, ख्रिस्ताच्या ज्ञानाचा प्रकाश व सुवार्तेची गौरवी सेवा, हा अनमोल ठेवा मातीच्या भांड्यांमध्ये आहे.
तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. येथे आमच्या व्यक्तित्वात होणारे बदल पौलाला अभिप्रित आहेत हे आपण लक्षात घ्यावेत. कल ३:१० मध्ये तो म्हणतो, ‘हा नवा मनुष्य ख्रिस्ताच्या प्रतिरूपा प्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. पवित्र आत्म्याने त्याचे नवीकरण केले जात आहे. तीत ३ :५ . रोम १२: २ प्रमाणे आमच्या मनाचे नवीनीकरण होते. आमचे आमचे सेवेकडे , सहबंधूंकडे, जगाकडे पाहण्याचे दृष्टीकोन बदलतात. म्हणून तो म्हणतो, आम्ही दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष न लावता, न दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावतो, कारण दिसणाऱ्या गोष्टी अल्पकालीक आहेत परंतु न दिसणाऱ्या गोष्टी सार्वकालिक आहेत.
आम्ही आशा सोडू नये: सुवार्तेचे सामर्थ्य व पवित्र आत्म्याच्या द्वारे सतत होणारे पवित्रीकरणाचे कार्य , यावर विश्वास ठेवावा. सेवेतील आपल्याला व विश्वासणाऱ्यांना प्राप्त होणारे प्रतिफळ आपल्याला थकू देणार नाही. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. यशया ४० :३ १
सेवेकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन असावा: संत पौल रोमकराच्या मंडळीस लिहितो कि मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण्यासाठी देवाचे सामर्थ्य आहे. रोम १: १६. तिमथ्याला मार्गदर्शन करताना तो म्हणतो, मला शक्ती देणाऱ्या प्रभू येशूचे मी उपकार मानतो कि त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. मी तर पूर्वी, निंदक, पाठलाग करणारा व अपमान करणारा होतो, तरी ते मी अविश्वासामुळे करीत होतो म्हणून माझ्यावर दया झाली. तसे ती त्याच्यावर सर्वकाळच्या जीवनासाठी विश्वास ठेवणाऱ्यांवरही होईल, याचे मी उदाहरण आहे. १ तिमथ्य १:१२-१६. माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत, गल ४ :१९.
मनाचे नवीकरण होऊ द्यावे: बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या. रोम १२:१-२.
आत्मिक बदल आवश्यक आहे, प्रीतीमध्ये ढोंग नसावे ती निष्कपट असावी; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा;
बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.
आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा;
आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा;
पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.
तुमचा छळ करणार्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.
आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्यांबरोबर शोक करा.
परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.
वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.
शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.
प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.
उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्यांची रास करशील.”
वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्याने वाइटाला जिंक.
प्रार्थनेने, वचनाचे शिक्षण, व देवाच्या आत्म्याच्या द्वारे आपण आपल्यात व विश्वासणाऱ्यात परिवर्तन घडून आणू शकतो: प्रेषित २ :४२ सांगते येरुशलेमेतील मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, व प्रार्थना करण्यात तत्पर होती. या गोष्टी आपल्या सेवेचा भाग आहेत का ?
पौल आणि बर्नबा यांनी अत्युखियाच्या, मंडळीत वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले. २ तिम ३: १६-१७ प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्धी होते . जखऱ्या ४ :६