वाढदिवसाचा संदेश
वचन : यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६.
प्रास्ताविक : हा आशीर्वाद याजकाने मंडळीस द्यावा असे परमेश्वर सांगतो, कारण या आशिर्वादात जीवनातील सर्व भागात देवाची कृपा व शांती मनुष्याला प्राप्त होते.
१} आशीर्वाद: आशीर्वाद म्हणजे देवाने एखाद्या मानवाला जास्त अनुकूल असणे , त्याला सामर्थ्य, संपन्नता व यश देऊन, जीवनाच्या सर्वच भागात चालवणे होय.अनुवाद २८:१-१३ सांगते,”जर तू यहोवाची वाणी ऐकशील तर देवाचे आशीर्वाद स्वतः येऊन तुझ्या जीवनाचा ताबा घेतील, जीवनाच्या सर्व भागात यश व कीर्ती मिळेल व देव तुला मस्तक बनवेल. शत्रूवर जय व देवाचे संरक्षण मिळेल.
२} संरक्षण: प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहित होते की, आपल्याला संरक्षणाची गरज आहे; म्हणून तो देवाकडे प्रार्थना केली की, “हे देवा तू जे नाव मला दिले आहे त्या तुझ्या नावात यांना राख.योहान १७:११. जेंव्हा आपण त्याच्या नावावर प्रीती करितो व त्याचे संरक्षण मागतो तेंव्हा देव आपले सर्व गोष्टींन पासून संरक्षण करितो. स्तोत्र ९१ सांगते देव आपले सर्व प्रकारच्या दृश्य व अदृश्य हल्ल्यांपासून संरक्षण करितो,
३} मुखप्रकाश किंवा मुखउंचावणे: देवाचा मुखप्रकाश त्याचे आपल्या जीवनातील सहाय्य, समक्षतता,व प्रसन्नता दर्शवते. स्तोत्रकर्ता म्हणतो, “कोण आम्हांला कल्याण दाखवील? असे म्हणणारे पुष्कळ आहेत; यहोवा, तू आपल्या मुखाचा प्रकाश आम्हांवर पाड. स्तोत्र ४:६. म्हणजे आपल्या कल्याणाचा स्रोत देवाचा मुखप्रकाश आहे, परंतु पुष्कळांना हे कळत नाही. देवाचा मुखप्रकाश आमच्या जीवनाच्या द्वारे पृथ्वीवर त्याचे गौरव करून घेतो. स्तोत्र ६७ १-७.
देवाच्या मुखप्रकाशात चालणे आपल्याला खूप आवश्यक आहे. जीवनातील निराशा, हे देवापासून दूर गेलेले जीवन दर्शवते. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, “हे देवा तू आम्हांस परत वळीव, आणि आपल्या मुखाचा प्रकाश पाड, म्हणजे आम्ही तरू. स्तोत्र ८०:३,७,१९. दावीद राजा म्हणतो, “तू आपल्या मुखाचा प्रकाश माझ्यावर पाड आणि तुझे नियम मला शिकीव. स्तोत्र ११९:१३५.
जीवनातील आनंद, उत्साह, सुख हे देवाच्या मुखप्रकाशातील जीवन दर्शवते. बायबल सांगते, जे लोक उत्साह शब्द जाणतात, ते सुखी आहेत, हे यहोवा ते तुझ्या मुखाच्या प्रकाशात चालतात. सारा दिवस ते तुझ्या नावाने उल्लासतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते उंचावले जातात. कारण त्यांच्या बलाची शोभा तूच आहेस, तुझ्या प्रसन्नतेने आमचे शिंग उंचावले जाईल. कारण आमची ढाल यहोवाची आहे, आणि आमचा राजा इस्राएलाच्या पवित्राचा आहे.स्तोत्र ८९:१५-१८. स्तोत्र कर्ता कोरहाचा मुलगा म्हणतो,”त्यांनी आपल्या तरवारीने देश मिळवला नाही, आणि त्यांच्या भुजांनी त्यांना तारले नाही, तर तुझ्या उजव्या हाताने व तुझ्या भुजाने आणि तुझ्या मुखाच्या तेजाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर प्रसन्न होतास. स्तोत्र ४४:३
४}कृपा : मानवाला देवाच्या कृपेची अत्यंत गरज आहे. कारण पापाच्या बंधनामुळे त्याला देवाच्या मार्गात चालणे शक्य होत नाही, म्हणून वेळोवेळी देवाची कृपा ठेवलेली आहे. बायबल सांगते,’ देवाच्या कृपेला खंड पडत नाही ती रोज सकाळी नवी होते. संत पौल इफिसकराच्या मंडळीस लिहितो,”तुम्ही कृपेने विश्वासाच्या द्वारे तारलेले आहा, आणि हे तुम्हांपासून नव्हे तर हे देवाचे दान आहे .इफिस २:८. देवाने आम्हांवर कृपा केली आम्हीं पापी असतांना त्याचे वैरी असताना तो आमच्या पापाच्या प्रायश्चितासाठी मेला. रोम ५:८. आमच्या आपराधांमुळे तो घायाळ झालेला होता, तो आमच्या अन्यायांमुळे चेचलेला होता, आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती; त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य मिळाले आहे .यशया ५३:५. John Stott says, “grace is love that cares and stoops and rescues “
५}शांती : शांती म्हणजे संपूर्ण कार्यसिध्दी, पवित्र शास्र सांगते, कशाचीही चिंता करू नका; तर सर्व गोष्टीं विषयी उपकारस्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. आणि देवाची शांती जी सर्व बुध्दीच्या पलीकडे आहे ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. फिली ४:६-७. यशया म्हणतो, ” हे यहोवा, आमच्या देवा तू आम्हांसाठी शांती ठरवशील, कारण आमची सर्वच कार्य तू आम्हांसाठी घडवून आणली आहेस. यशया २६:१२.
प्रभू येशू म्हणतो,”मी तुम्हांस शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांस देतो; जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हांस देत नाही. तुमचे अंतःकरण घाबरू नये व भिऊही नये योहान १४:२७. पुढे तो योहान १६:३३ मध्ये म्हणतो,”मी तुम्हांस ह्या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत कि माझ्यामध्ये तुम्हांस शांती असावी. जगामध्ये तुम्हांस संकट आहे, परंतु धीर धरा मी जगाला जिकंले आहे.”
रेव्ह. कैलास {आलिशा } साठे.