शब्बाथाचे महत्व
वचन: देवाने आशीर्वाद देऊन सातवा दिवस पवित्र ठरवला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून तो त्या दिवशी विश्राम पावला. उत्पत्ती २:३
आपण शब्बाथ दिवस नेमका कोणता यावर वाद करतो,परंतु तो कसा पाळावा हे समजून घेत नाही. आपण नेहमी आपले दृष्टीकोन समोर ठेऊन विचार करतो व त्यानुसार आपले धर्माचरण आकार घेते. त्यामुळेच शब्बाथ बद्दल बऱ्याच गैरसमजुती निर्माण झाल्या व यातून अनेक जाचक धार्मिक नियम लोकांवर लादण्यात आल्याचे आपण यहुदी संप्रदायात पहातो. येशू ख्रिस्ताने अडतीस वर्ष्याच्या दुखणेकरुला बरे केले व सांगितले आपली बाज उचल व चालू लाग, त्या प्रमाणे त्याने आपली बाज उचलली व चालू लागला, आजारी असताना तो हालचाल करू शकत नव्हता पण आता तो ज्या बाजेवर पडून होता तीच उचलून घेऊन चालू लागला. “त्या दिवशी शब्बाथ होता; या वरून यहुदी बरे झालेल्या त्या मनुष्यास म्हणाले, आज शब्बाथ आहे बाज उचलणे तुला योग्य नाही.” योहान ५:१०–१८, एकदा येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य शेतातून जात असता कणसे खुडून खात होते यावरून परुशी त्यांना म्हणाले तुम्ही जे शब्बाथ दिवशी करू नये ते का करिता. तेव्हा येशू ख्रिस्ताने त्यांना उलट प्रश्न विचारला की, दाविदाने व त्याच्या माणसांनी भूक लागली असता; समर्पित भाकरी का खाल्ल्या, ज्या फक्त याजकच खाऊ शकत होते.मार्क २:२३–२८, ३:१–६. असे एक नाही अनेक प्रसंग शब्बाथावरून जनमानसाच्या जीवनात उदभवत असत. व आजही उदभवत आहेत.
देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र ठरवला, सहा दिवस विश्वाची रचना करून पुन्हा त्याचे अवलोकन केले, या भव्य दिव्य विश्वाचे देवाने पुनरावलोकन करून समजून घेतले कि आपण केलेले सर्व चांगले आहे ते पावित्त्र्याच्या सर्वबाजूने योग्य आहे. ते त्याच्या न्यायीपणाने, प्रितीने, व आशीर्वादाने पूर्ण आहे असे जेंव्हा त्याच्या लक्षात आले तेंव्हा त्याने सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन पवित्र ठरवले व विश्राम घेतला. सातव्या दिवसाला पवित्र ठरवणे हा त्याच्या सहादिवसाच्या कामाचा परिपाक घोषित करणे आहे, व विसावा घेणे म्हणजे शारीरिक थकव्यामुळे आराम करणे असे नाही; तर त्याने केलेल्या विश्वरचनेच्या कामातून त्याला प्राप्त झालेले समाधान आहे.
देवाने इस्राएलाला शब्बाथ पाळण्याची आज्ञा केली ती यासाठीच कि त्यांनी प्रत्येक दिवसाचे काम देवाच्या आज्ञे नुसार आहे कि नाही ते पहावे व शेवटी सातव्या दिवशी खरा विश्राम म्हणजे समाधान प्राप्त करावे.पवित्र दिवसाला पवित्र जीवनाने सामोरे जाणे व अधिक आशीर्वाद प्राप्त करणे यात अभिप्रित आहे.शब्बाथ दिवस आमच्या आत्मिक जीवनाचा आढावा घेऊन आपल्याला पवित्रतेच्या अनुभवामध्ये वाढण्या साठीची
प्रक्रिया आहे.
प्रार्थना: प्रभू येशू तुझा पवित्र आत्मा मला संपूर्ण पवित्र जीवन जगण्यास सामर्थ्य देतो म्हणून मी तुझे आभार मानतो.रोज पवित्र जीवन जगण्यास मला साहाय्य कर, तुझ्या मंदिरात मी समाधानाने येईल व आशीर्वादित होईल असे कर.येशूच्या नावाने मागतो आमेन.