सफलतेचे रहस्य
वचन:सात्विकाच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते, त्याचे वतन सर्वकाळ टिकते स्तोत्र ३७:१८.
प्रास्ताविक : आज जगात सात्विक जीवनाला कोणी महत्व देत नाही. माणसे एकमेकांना अनुसरत असतात. त्यामुळे आज आपण सर्रास हे ऐकतो की; ‘आजकाल कोण सत्याने वागतो‘ या वरून असे दिसते की जगात खूपच कमी लोक आहेत जे खरे सात्विक जीवन जगतात. म्हणून आपल्याला सर्वत्र काळाबाजार, भ्रष्टlचार, फसवणूक पाहावयास मिळते. माणसे क्षणिक सुखाच्या मागे धावतात परंतु त्यांना दुःख अधिक प्राप्त होते. सैतानाने पसरवलेल्या मोह मायेच्या जाळ्यामुळे कोणाच्या हे लक्ष्यात येत नाही. वरवरच्या दिखाव्याला बळी पडून माणसे एकमेकांवर जळतात, एकमेकांना विरोध करितात व एकमेकांशी सूड भावनेने वागतात. धार्मिकांनी एक गोष्ट येथे लक्षात घ्यावी ती हि की त्यांनी या जगिक गोधळा पासून स्वतःला दूर ठेवावे.
संभ्रमित असू नये : अनेकदा आपल्याला जगातील समृद्ध लोकांनाच हेवा वाटतो. आपण विचार करितो की हि माणसे कोणतेच नीतिनियम न पाळताही इतकी सुखी कशी? मग आपण इतके धार्मिक जीवन जगून काय उपयोग ?आपणही काहीतरी करून समृद्ध झाले पाहिजे, असे एक नाही अनेक विचार आपल्या मनात येतात. परंतु लक्षात घ्या देव सहा गोष्टींचा द्वेष करितो, होय, सात गोष्टींचा त्याला वीट वाटतो त्या ह्या आहेत. गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ, आणि निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट संकल्प योजणारे दृदय, दुष्कर्माकडे त्वरित धावणारे पाय, खोटे बोलणारा लबाड साक्षी, आणि भावांमध्ये बेबनाव पेरणारा. नीतिसूत्रे ६:१२–१५. जगातील समृद्धीचे मार्ग हेच आहेत, प्रत्येक व्यवसायात,नोकरीत, सामाजिक, धार्मिक, व राजकीय जीवनात. आपण लबाडी, फसवणूक, दुष्ट संकल्प, भेद निर्माण करणे, व निर्दोष असलेल्यांना वेठीस धरणे यासारख्या गोष्टी पहात आहोत. अशा मार्गाने मिळवलेली समृद्धी शापित असते.
दृढ विश्वास ठेवा: “यहोवा पवित्र मंदिरात आहे; यहोवाचे राजासन आकाशात आहे. त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पाहतात त्याच्या पापण्या त्यांना
पारखतात. यहोवा न्यायीला पारखतो, पण त्याचा जीव दुष्ट व जुलमाची आवड धरणारा यांचा द्वेष करतो.” स्तोत्र :११:४–५ . देव सात्विकास पारखतो याचा अर्थ तो त्याला कसला लावतो पण त्याच बरोबर तो त्याच्यावर कृपादृष्टीही ठेवतो. तो व्यक्ती वाईटाचा वीट मानतो व वाईट लोकांपासून स्वतःला दूर ठेवतो, तो व्यक्ती आशीर्वादित होतो. म्हणून देवाच्या अस्तित्वावर व त्याच्या न्यायीपणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो, “न्यायी खजूरीच्या झाडासारखा टवटवेल, लबालोनातील गंधसरूंसारखा तो वाढेल. ते यहोवाच्या घरात रोपलेले आहेत, ते आमच्या देवाच्या अंगणात भरभराट पावतील. म्हातारपणातही ते फळ देत जातील, ते रसभरीत व टवटवीत होतील. हे यासाठीकी यहोवा सरळ आहे हे त्यांनी प्रगट करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही,” स्तोत्र ९२:१२–१५.
धीर धरून वाट पहा : सात्विक, धार्मिक, नीतिमान, हे समानार्थी शब्द आहेत. पंडिता रमाबाई यांनी सात्विकला ‘पूर्ण’ असेही म्हटले आहे. त्यांनी केलेले भाषांतर असे आहे,’पूर्ण जनांनवर देवाची दृष्टी असते. परमेश्वर त्याला नित्य सहाय्य होतो. म्हणून त्याचे वतन सर्वकाळ टिकते. वाईट समय जरी त्यांच्या जीवनात आला तरी ते लज्जित होणार नाहीत. आणि दुष्काळाच्या दिवसातही ते तृप्त होतील स्तोत्र ३७:१९ . न्यायीची कष्ट पुष्कळ आहेत, परंतु त्या सर्वातून यहोवा त्याला सोडवतो; त्याची सर्व हाडे सांभाळतो; त्यातून एकही मोडत नाही” स्तोत्र ३४:१९–२०. इस्राएलाला आशा धरून राहण्याविषयी संदेश देताना यशया म्हणतो,”हे याकोबा, तू का म्हणतोस, आणि हे इस्राएला, तू का बोलतोस की माझा मार्ग यहोवापासून गुप्त आहे, आणि माझ्या देवापासून माझा न्याय सरून गेला आहे? तू जाणले नाही काय? तू ऐकले नाही काय ? सनातन देव यहोवा पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा थकत नाही, दमत नाही, त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही. तो थकलेल्यांना शक्ती देतो व अशक्तांचे बल वाढवतो. तरुण देखील टाकतील व दमतील, आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करितात ते आपली शक्ती नवी करतील ते गरुडासारखे पंखानी वर जातील, ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी थकणार नाहीत. यशया ४०:२७–३१. म्हणून आपण धार्मिकतेची कास धरावी, परिपूर्ण जीवन हेच आपले ध्येय असावे. यातच आपले कल्याण आहे.
प्रार्थना: हे प्रभू येशू तुझी कृपादृष्टी धार्मिकांवर आहे म्हणून मी तुझे आभार मानतो दुष्ट लोकांच्या धना कडे पाहून माझे मन त्यांच्या मार्गाकडे वळू देऊ नको. मला तुझे संरक्षण व पुरवठा लाभू दे. येशूच्या नावाने मागतो. आमेन.