
देवाचे वचन हे आपल्या विश्वासाचा पाया आहे. आपले वर्तमान व भविष्यकाळ देवाच्या वचनावरील दृढ विश्वासावर आधारित आहे. त्यामुळे आपण रोज देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनावर विश्वासाच्या घोषणा कराव्यात. मात्र ज्या घोषणा आपण करतो त्यानुसारच आपला विश्वास ठेवावा. घोषणा विजयाची करून आपण भीतीमध्ये वागणे हे आमच्या विश्वासाच्या विपरीत होईल, आणि आपण इच्छित फळांपासून दूर राहू. म्हणून जशी आपण घोषणा करितो तसाच आम्ही विश्वास ठेवावा, व त्यानुसार कृतिशील जीवन जगावे.
आपले जीवन फलद्रुप असावे हे आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण फलद्रुप असावे अशी देवाची इच्छा आहे. देवाची अभिवचने आम्हाला आपल्या फलद्रुप भविष्याची खात्री देतात. म्हणून आम्ही जेव्हा त्या अभिवचनावर विश्वास ठेऊन आनंदाने आणि विश्वासाने आपल्या उज्वल भविष्याची खात्री प्रभू येशूच्या नावाने घोषित करतो तेव्हा त्या प्रमाणे घडून येते. स्तोत्र २३ हि दाविदाची विश्वासाची घोषणाच आहे, आणि त्याप्रमाणेच दाविदाचे जीवन फलद्रुप झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते.
आपल्या देवाच्या अभिवचनावर आधारित असाव्यात. जसे उत्पत्ती १ :२ ८ सांगते, “देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.” ह्या अभिवचनावर विश्वास ठेऊन आपण घोषणा करावी की, ‘ मी फलद्रुप आहे, माझी वंशवृद्धी झाली आहे, अधिकार व सामर्थ्य मला देवाने दिले आहे. किंवा “हे स्वर्गीय पित्या, मी घोषित करतो की तुझ्याद्वारे मला आशीर्वादित केले आहे आणि फलदायी होण्यासाठी व वंशवृद्धी करण्यासाठी सामर्थ्य दिले आहे (उत्पत्ति १:२८).
मी पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे; मी हाती घेतलेल्या कामात मला यश मिळते आणि मी समृध्दी पावत आहे (स्तोत्रसंहिता १:३).
मी ख्रिस्तामध्ये राहण्याचा निर्णय घेतो आणि मी घोषित करतो की मी पुष्कळ फळ देईन (योहान १५:५).
मी विश्वासात स्थिर आहे आणि माझ्या हातांचे काम स्थिर आहे (स्तोत्रसंहिता ९०:१७).
मी सहभागी असलेली प्रत्येक योजना, प्रकल्प आणि नातेसंबंध चिरस्थायी फळ देतील (योहान १५:१६).
मी घोषित करतो की वांझपणाला माझ्या मनावर, शरीरावर किंवा श्रमावर काहीही अधिकार नाही. परमेश्वराने माझ्यावर आपला आशीर्वाद दिला आहे, ज्यामुळे मी शहरात आणि शेतात फलदायी झालो आहे आणि मी ज्याला स्पर्श करतो ते यशस्वी होते. (अनुवाद २८:१-४).
मी आत्म्याच्या फळांनी—प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दया, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम यांनी—ओतप्रोत भरलेला आहे (गलतीकरांस ५:२२-२३).
येशूच्या नावाने, आमेन!
तुम्ही तुमच्या करिअर/व्यवसायात, कुटुंब/आरोग्यात किंवा आध्यात्मिक जीवनात फलदायीपणा शोधत आहात का? या काळात तुम्ही कोणत्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये वाढ पाहण्यासाठी प्रार्थना करत आहात? तुम्हाला जिथे यशाची गरज आहे, तिथेच तुमची कबुली देवाच्या वचन नुसार विश्वासाने केंद्रित करा . देव त्याप्रमाणे घडून आणेल.
रेव्ह कैलास (आलिशा ) साठे.