शास्त्रभाग: स्तोत्रसंहिता ८५
१ हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
२ तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस, त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस.
(सेला)
३ तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस; तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.
४ हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण; आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर.
५ तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय?
६ तुझ्या लोकांनी तुझ्या ठायी हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय?
७ हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे, व तू सिद्ध केलेले तारण आम्हांला दे.
८ परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन; कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील; मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.
९ खरोखर त्याचे भय धरणार्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.
१० दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे;
११ पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे; स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे.
१२ जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमी आपले फळ देईल.
१३ त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.
विषय: “राष्ट्राचे तारण, आध्यात्मिक जागृती आणि परिवर्तन”
“राष्ट्राचे तारण, आध्यात्मिक जागृती आणि परिवर्तन” हा विषय समजून घेताना. याची प्रगतिशील प्रक्रिया व आंतरिक संबंध समजावून घ्यावा लागेल. तारण, पुनरुज्जीवन आणि राष्ट्रीय परिवर्तन हि एक आध्यात्मिक प्रगतिशील प्रक्रिया आहे. जिच्यातून वैयत्तिक जागृतीच्या द्वारे समाजाचा नैतिक, सांस्कृतिक आणि संरचनात्मक पाया नव्याने घडतो. म्हणजे आधी वैयत्तिक परिवर्तन नंतर मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक जागृती व त्यानंतर राष्ट्राचे तारण होते. याचा अर्थ असा आहे, हि प्रक्रिया व्यक्ती, कुटुंब, मंडळी व संपूर्ण समाज अशी बाहेरच्या दिशेने वाढत जाणारी आहे.
राष्ट्र म्हणजे काय ? बायबलमध्ये जुन्या आणि नवीन करारात वापरलेल्या ‘राष्ट्रे’ या शब्दाचा अर्थ ‘लोक’ असा आहे. हिब्रू शब्द ‘गॉय’ हा “राष्ट्र, लोक” म्हणून वापरला जातो. नवीन करारात, वापरलेला ग्रीक शब्द ‘एथ्नोस’ आहे, ज्याचा अर्थ “एक वंश लोक, एकत्र राहणारा समुदाय” असा होतो.
उदा:मिसर देशात होते ते इस्राएल राष्ट्र , आपल्या देशाची फाळणी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार झाली.
राष्ट्राचे तारण म्हणजे काय ? या बद्दल दोन प्रकारचे दृष्टीकोन आपण समजून घेऊ. एक म्हणजे, भौतिक दृष्टीकोनातून विचार केल्यास राष्ट्राचा सर्वांगीण विकास म्हणजे राष्ट्राचा उध्दार किंवा तारण असा अर्थ आपण काढू शकतो. यामध्ये फक्त आर्थिक फक्त विकास महत्वाचा नसतो तर शैक्षणिक, नैतिक, सामाजिक एकता व समाजाप्रती कर्तव्य भावना, संस्कृती व राष्ट्रभक्ती या प्रकारचा सर्वसमावेशक विकास अभिप्रित असतो.
पवित्रशास्त्रीय दृष्टीकोन, बायबलमध्ये , राष्ट्राच्या तारणाचा अर्थ संकटातून सुटका आणि येशू ख्रिस्ताद्वारे देवाच्या सार्वकालिक राज्यात आध्यात्मिक समावेश, या दोन गोष्टी आहेत
१ ] जुना करार:
राष्ट्रीय मुक्ती, सुटका: हिब्रू बायबलमध्ये, राष्ट्रीय तारणाचा अर्थ अनेकदा देवाने एखाद्या समुदायाला शारीरिक धोके, छळ किंवा हद्दपारीतून वाचवणे असा होता, जसे की इस्राएल लोकांचे इजिप्तमधून निर्गमन. “पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्यांच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली; त्यांतला एकही वाचला नाही. पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले; आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिसर्यांच्या हातातून इस्राएल लोकांना तारले आणि मिसरी लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएलांनी पाहिले. निर्गम १४:२८-३०
देवाचे आशीर्वाद: राष्ट्रीय कल्याण हे अन्यायापासून दूर वळून देवाच्या नैतिक नियमांकडे परतण्याशी जोडलेले होते. यिर्मया ३३:६ सांगते तर पाहा, “मी ह्या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांना बरे करीन, आणि शांती व सत्य ह्यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रकट करीन.” अनुवाद ७: १३-१५ सांगते, “तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील; जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षारस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल. तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील; तुझ्यातला किंवा तुझ्या पशूंतला कोणी नर किंवा मादी वांझ राहणार नाही; आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत, त्यांतली एकही तुला लागणार नाही; पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावील.” यशया ६०:१८ सांगते, “ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.”
जगासाठी प्रकाश: देवाने इस्राएल राष्ट्राची निवड या उद्देशाने केली की, त्याने इतर सर्व जागतिक समुदायांना आशीर्वाद द्यावा आणि अंतिमतः त्यांना स्वतःकडे वळवावे. यशया ४२:६ सांगते, “मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन;” “तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.” यशया ४९:६, “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.” यशया ६०:३ .
नवा करार: सर्व राष्ट्रांसाठी तारण
आध्यात्मिक मुक्ती: नवीन करार एका राजकीय सत्तेवरून लक्ष हटवून प्रत्येक वांशिक गट, जमात आणि भाषेतील लोकांवर केंद्रित करतो.
ख्रिस्तावरील विश्वास: वैयक्तिक आणि सामूहिक तारण हे राजकीय सत्ता किंवा राष्ट्रीय अस्मितेद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने त्याच्या कृपेद्वारे प्राप्त होते.इफिस २:८-१० सांगते,”कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.
वैश्विक व्याप्ती: देवाची अंतिम योजना संपूर्ण जगातील लोकांना आरोग्य, शांती आणि आध्यात्मिक मुक्ती देणे, आणि त्यांना ख्रिस्ताच्या राज्याखाली एकत्र आणणे. मत्तय २८:१८-२० याबद्दल सांगते, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
राष्ट्राच्या तारणासाठी आध्यात्मिक जागृतीचे महत्व : राष्ट्राच्याच्या तारणासाठी आत्मिक दृष्टीकोनातून जागृत असणे फार महत्वाचे आहे. स्वप्रयत्न, मानवी योजना व्यर्थ आहेत. कारण वचन सांगते, योजना करणे मनुष्याच्या हाती आहे , परंतु जिभेने उत्तर देणे परमेशवराच्या हाती आहे. शेवटी आपण समजून घेतले पाहिजे की, ” बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.” जखऱ्या ४:६ .
२ इतिहास ७:१४ तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन.
रोम १:१६ कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.
इफिस ५:१४ म्हणून तो म्हणतो, “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”
आध्यात्मिक जागृतीची प्रक्रिया: ब्रायन एच. एडवर्ड्स यांनी त्यांच्या ‘रिवायव्हल: अ पीपल सॅचुरेटेड विथ गॉड’ या पुस्तकात पुनरुज्जीवनाची एक व्यापक व्याख्या दिली आहे, जी माझ्या मते अशी आहे: “खरे पवित्र आत्म्याचे पुनरुज्जीवन म्हणजे देवाच्या लोकांच्या आध्यात्मिक जीवनात होणारी एक उल्लेखनीय वाढ, ज्यासोबत देवाच्या उपस्थितीची अद्भुत जाणीव, प्रार्थना आणि स्तुतीची तीव्रता, पापाबद्दल तीव्र पश्चात्ताप, पवित्रतेची उत्कट तळमळ आणि सुवार्ता प्रचारात असामान्य परिणामकारकता असते, ज्यामुळे अनेक अविश्वासणाऱ्यांचे तारण होते.”
विशेष म्हणजे, पुनरुज्जीवनाचा अनुभव केवळ विश्वासणाऱ्यांनाच येऊ शकतो—म्हणजेच, ज्यांना ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे पवित्र आत्म्याने जिवंत केले आहे त्यांनाच. अविश्वासी (म्हणजेच, आत्मिकदृष्ट्या मृत व्यक्ती) पुनरुज्जीवित होऊ शकत नाही; त्याला प्रथम पुन्हा जन्म घ्यावा लागतो, कारण त्याच्यामध्ये पुनरुज्जीवित करण्यासारखे जीवनच नसते. तरीही, हे लक्षात ठेवा की, अनेक पापी लोकांना खऱ्या पश्चात्तापाकडे आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासाकडे आणण्यासाठी, देव आपल्या लोकांच्या पुनरुज्जीवनाचा उपयोग करण्यास प्रसन्न आहे. किंवा, एडवर्ड्स म्हणतात त्याप्रमाणे, पुनरुज्जीवनामुळे “अनेक अविश्वास्यांचे तारण” होते.
शिष्यत्व आणि प्रभावक्षेत्रे: धोरणात्मक आराखडे यावर भर देतात की, खऱ्या राष्ट्रीय बदलासाठी कुटुंब, चर्च, शिक्षण आणि नागरी नेतृत्व यांसारख्या प्रमुख सामाजिक क्षेत्रांमध्ये विश्वासणाऱ्यांना नैतिक आणि विधायक शक्ती म्हणून कार्य करण्यासाठी सुसज्ज करणे आवश्यक आहे.
प्रार्थाना: पुनरुज्जीवन हे अंतिमतः आपल्या सार्वभौम देवाचे कार्य आहे, ते प्रामुख्याने आपल्या भल्यासाठी नव्हे, तर त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी असते. अहो, एक राष्ट्र म्हणून आपल्यावर आपला आत्मा ओतण्यासाठी—आपल्या भग्न भूमीला बरे करण्यासाठी—आपण देवाला आर्ततेने साद घालणे थांबवू नये. देवासाठी काहीही अशक्य नाही! आपण पुनरुज्जीवनाचा अनुभव घेत नाही याचे एक कारण असे असू शकते का की आपण ते कळकळीने मागत नाही? जसे याकोब आपल्याला सांगतो, “तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही” (याकोब ४:२).
या स्तोत्राचा शास्त्रवचनीय आधार स्तोत्रसंहिता ८५:४-७ आहे: “हे आमच्या तारणाच्या देवा, आम्हाला पुन्हा स्थिर कर आणि आमच्यावरील तुझा क्रोध दूर कर! तू आमच्यावर सदासर्वकाळ रागावणार आहेस काय? तू आपला क्रोध सर्व पिढ्यांपर्यंत वाढवणार आहेस काय? तू आम्हाला पुन्हा जिवंत करणार नाहीस काय, म्हणजे तुझे लोक तुझ्यात आनंदित होतील? हे परमेश्वरा, आम्हाला तुझे अविचल प्रेम दाखव आणि आम्हाला तुझे तारण दे.”
जागृतीची सुरुवात स्वतःपासून होते: आणि आपल्या देशातील मंडळीला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करण्यापूर्वी, आपण प्रथम देवाला स्वतःला पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली पाहिजे. पुनरुज्जीवनाची सुरुवात आपल्यासारख्या विश्वासणाऱ्यांपासूनच झाली पाहिजे. इंग्रज सुवार्तिक रॉडनी “जिप्सी” स्मिथ (१८६०-१९४७) यांना एकदा पुनरुज्जीवनाचे रहस्य विचारण्यात आले. त्यांचे उत्तर मन हेलावून टाकणारे आहे: “घरी जा. खडूचा एक तुकडा घ्या. स्वतःभोवती एक वर्तुळ काढा. मग प्रार्थना करा, ‘हे प्रभू, या वर्तुळाच्या आतील सर्व गोष्टींना पुनरुज्जीवित कर.’” हीच तुमची आणि माझी प्रार्थना असायला हवी: “हे प्रभू, आधी मला पुनरुज्जीवित कर.”
गेल्या काही आठवड्यांत, देवाने तुमचे हृदय पुनरुज्जीवित करावे, ही तुमची खरोखरच प्रार्थना होती का? इतरांनी बदलण्याची गरज पाहण्यात आपण किती तत्पर असतो, पण आपल्या स्वतःच्या पुनरुज्जीवनाच्या गरजेकडे दुर्लक्ष करतो. आपण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहतो, पण आपल्या स्वतःच्या डोळ्यातील ओंडका नाही (मत्तय ७:३). इतरांवर टीका करण्यापूर्वी, आपण आधी स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे.
पुनरुज्जीवन ही आपल्या राष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. पण आपण देवाला आपले राष्ट्र आणि आपले नेते पुनरुज्जीवित करण्याची विनंती करण्यापूर्वी, आपण त्याला स्वतःला पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली पाहिजे.
परिवर्तन: ‘पुनरुज्जीवन’ हा शब्द दोन लॅटिन शब्दांपासून आला आहे, ‘रे’ म्हणजे ‘पुन्हा’ आणि ‘विवो’ म्हणजे ‘जगणे’. म्हणून, याचा अर्थ ‘पुन्हा जगणे’ असा होतो. ख्रिस्ती व्यक्तीच्या आध्यात्मिक जीवनाला लागू केल्यास, हे पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे ख्रिस्तावरील विश्वासणाऱ्यांचे पुनर्स्थापन आहे. दीर्घकालीन सामाजिक परिणाम, जिथे नवचैतन्य प्राप्त केलेले लोक बायबलच्या मूल्यांनुसार सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक आणि शासकीय प्रभावक्षेत्रांवर प्रभाव टाकतात.
लक्षात घ्या की ‘पुनरुज्जीवन’ हे राजकीय नाही, ते शासन करणे नाही, आणि ते कोणताही विशेष हक्क किंवा विशेषाधिकार सांगणे नाही. पुनरुज्जीवन म्हणजे देवाशी नाते जोडणे, जे लोकांना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये योग्य आणि नैतिक गोष्टी करण्यास प्रवृत्त करते.
लक्षात ठेवा, पुनरुज्जीवन म्हणजे जीवन बदलणे. जसजसे पुनरुज्जीवन राष्ट्रांमध्ये पसरेल, तसतसे बाकी सर्व गोष्टी आपोआप घडून यते
जागृती बद्दल सावधगिरी : म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. १ करिंथ १०:१२. शास्त्या पुस्तक याचे चांगले उदाहरण आहे.
रेव्ह. कैलास [अलिशा ] साठे